महाराष्ट्र

दरड कोसळून नऊ जणांचा मृत्यू

24 July :- सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील आंबेघर गावामध्ये शुक्रवारी मध्यरात्री तीन वाजता पायथ्याला असलेल्या घरांवर दरड कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज असून एनडीआरएफकडून त्यांचा शोध सुरु आहे. तसेच मीरगावमध्येही दरड कोसळली,10 जण गाडले गेल्याची शक्यता आहे. आंबेघरमधे भुस्खलन होऊन काही लोक कालपासून बेपत्ता आहेत. मदतीसाठी येथे एनडीआरएफला पाचारण करण्यात आले आहे. आज सकाळपासून एनडीआरएफची टीम आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बोटींच्या सहाय्याने आंबेघरमधे जाण्याचा प्रयत्न केला.

अखेर दुपारच्या सुमारास एनडीआरएफसह सरकारी अधिकाऱ्यांची टीम आंबेघरमध्ये पोहोचली. सध्या बचावकार्य वेगाने सुरु आहे. या दुर्घटनेत सहा कुटुंबं आणि त्यातील 16 व्यक्ती ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या. जे वाचले ते आवाजाने दूर पळाले आणि त्यांनी मदतीसाठी शेजारच्या गोकुळ गावाकडे धाव घेतली. सकाळी मदतकार्य पोहोचवण्याचा प्रशासनाने प्रयत्न केला. पण अलिकडच्या गोकुळ गावातील रस्ता मोरणा नदीला आलेल्या पुरामुळे बंद झाला होता. त्यामुळे एनडीआरएफची टीम आणि इतर यंत्रणाही अपघातस्थळी पोहचू शकल्या नाहीत.

शनिवारी पाणी कमी झाल्यावर गोकुळ गावातील रस्ता पार करुन चालत दोन तासांचे अंतर पार करुन स्थानिक तरुण अपघातस्थळी पोहचले आणि गावातील इतर लोकांसह त्यांनी मदतकार्य सुरु केले. त्यानंतर दुपारी एनडीआरएफची टीम पोहचली. जिथे ही दरड कोसळलीय त्या जागेपर्यंत जाणारा रस्ता पावसाने आणि भुस्खलनने वाहून गेलाय त्यामुळे पोकलेन मशिन तिथपर्यंत नेता येत नाहीत. त्यामुळे हातांनी राडारोडा उचलून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचे मृतदेह बाहेर काढणं सुरु आहे. आज या अपघातस्थळी साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि इतर अधिकाऱ्यांनी भेट दिली तर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी अलीकडच्या गोकुळ गावापर्यंत जाऊन पाहणी केली.