महाराष्ट्र

उसाच्या फडात बळजबरी अल्पवयीन मुलीबरोबर केले लग्न

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

19 July :- समाजात मुलींचा जन्मदर मुलांच्या तुलनेत कमीच आहे. परिणामी अनेक तरूणांना लग्नाविनाच रहावे लागते आहे. काही ठिकाणी आंतरजातीय, तर काही ठिकाणी आंतरधर्मीयही लग्न होत आहेत. काही जण कायदा हातात घेत अल्पवयीन मुलींसोबत लग्नगाठ बांधून घेत आहेत.देशात बालविवाहास बंदी आहे. परंतु गरिबीचा फायदा घेऊन काही लोक बालविवाह उरकून घेत आहेत. त्यांना कायद्याचा धाक नसल्याने अशा घटना घडत आहेत. परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील मंजरथ येथे अजब पद्धतीने अल्पवयीन मुलीचे लग्न लावण्यात आले.

उसाच्या फडात काम करीत असताना मुलीला उचलून नेत आरोपीने लग्नगाठ बांधली. या लग्नाला मुलीचा तीव्र विरोध आहे. तिच्या माहेरकडील मंडळींनीही पोलिस ठाण्यात या लग्नाविरोधात धाव घेतली आहे. पोलिसांकडून गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. नातेवाईकांनी तसा आरोप लावला आहे. मुलीचे वय अवघे तेरा वर्षे आहे. आणि नवरदेव आहे 28 वर्षांचा.मंजरथ गावात संबंधित मुलगी आपल्या आई-वडिलांसह राहते. हे गाव एक हजार लोकवस्तीचे आहे. मुलगी इयत्ता पाचवीत शिकते. आई-वडील शेतमजूर आहेत. गरिबीची परिस्थिती असल्याने मुलगीही त्यांना शेतमजुरीत मदत करते. त्या मुलीसोबत लग्न करण्यासाठी किशोर सूळ (वय 28) याने आग्रह धरला होता.

मागील काही दिवसांपासून तो मुलीच्या आई- वडिलांमागे त्याने लकडा लावला होता. मात्र, मुलीच्या आईचा या लग्नाला तीव्र विरोध होता. मुलगी आणि तिची आई लग्नाला तयार होत नसल्याने त्याने एनकेनप्रकारे दबाव आणण्यास सुरूवात केली. नंतर धमक्या सुरू केल्या. याचाही काही उपयोग होत नसल्याने त्याने जबरदस्तीने लग्न लावण्याचा डाव आखला. मुलगी आणि तिची आई शेतात खुरपणी करीत होत्या. त्यावेळी सूळ तेथे गेला. त्याने जबरदस्तीने मुलीला आणि तिच्या आईला उसाच्या फडात नेले. आणि दबाव टाकून तेथे त्या अल्पवयीन मुलीसोबत लग्नगाठ बांधली.या लग्नाचा कोणत्याही नातेवाईकांना थांगपत्ता लागू दिला नाही. मुलीच्या वडिलांना दारूचे व्यसन आहे. त्यांना दारू पाजून राजी करण्यात आले.

या लग्नाला आमचा तीव्र विरोध आहे. पोलिस आमची तक्रार घेत नाहीत. मुलगी सूळ याच्या ताब्यात आहे. तिची सुटका होणे गरजेचे आहे. हे लग्न कायद्याविरोधात असल्याने दोषींवर कारवाई होणे गरजेचे आहे, अशी मुलीच्या मामाची मागणी आहे. मुलीच्या आईचे मामाही या लग्नाच्या विरोधात आहेत. या घटनेची माहिती कळल्यानंतर सामजिक संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. कायद्याने महाराष्ट्रात बालविवाह करता येत नाही. तो एक प्रकारचा गंभीर गु्न्हा आहे. अशा प्रकारच्या घटना वारंवार होतात. कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने अनेक मुली अंधकारात लोटल्या जात आहेत. पोलिसांनी तात्काळ या प्रकरणात लक्ष घालावे.