क्रीडा

माजी क्रिकेटपटू ‘यशपाल शर्मा’ यांचे निधन

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

13 July :- भारताचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. यशपाल शर्मा 1983 च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य होते. 11 ऑगस्ट 1954 रोजी पंजाबमधील लुधियानामध्ये यशपाल शर्मा यांचा जन्म झाला होता. यशपाल शर्मा टीम इंडियाच्या निवड समितीचे सदस्यही होते.

मीडिया रिपोर्टनुसार, यशपाल शर्मा सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. मॉर्निंग वॉक करुन परतल्यानंतर त्यांनी कुटुंबियांना अस्वस्थ वाटत असल्याचं सांगितलं होतं. कुटुंबियांनी तत्काळ रुग्णालयात धाव घेतली. पण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच सकाळी 7.40 वाजता त्यांचं निधन झालं. यशपाल शर्मा यांनी आपल्या कारकिर्दित अनेक महत्त्वाच्या भूमिका निभावल्या. 1983च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे यशपाल शर्मा हे सदस्य होते. 37 कसोटी सामन्यांममध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधीत्व केलं. यांत 34च्या सरासरीने 1 हजार 606 धावा केल्या. तर 42 एकदिवसीय सामन्यांत शर्मा यांनी 883 धावा केल्या होत्या. 1980च्या सुमारास शर्मा भारताचा मधल्या फळीतील फलंदाज होते.

1983 च्या विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्यांनी 89 धावांची खेळी केली होती. तर इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात त्यांनी 61 धावांची खेळी केली होती. निवृत्तीनंतर त्यांनी भारतीय क्रिकेट निवड समिती सदस्य आणि समालोचकाची जबाबदारीही पार पाडली होती. यशपाल शर्मा यांनी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 2 ऑगस्ट 1979 रोजी लॉर्ड्सच्या मेदानावर आपल्या पदार्पणाचा सामना खेळला होता. त्यांनी आपला शेवटचा कसोटी सामना वेस्ट इंडिजच्या विरोधात 29 ऑक्टोबर 1983 रोजी खेळला होता. याव्यतिरिक्त 13 ऑक्टोबर 1978 रोजी पाकिस्तानच्या विरोधात एकदिवसीय क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता. इंग्लंड विरोधात 27 जानेवारी 1985 रोजी शेवटचा एकदिवसीय सामना खेळले होते.