कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा आयएमए चा इशारा
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
12 july : करोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरल्यानंतर नागरिकांनी पुन्हा एकदा गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळावर लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे करोनाची तिसरी लाट जवळ असल्याचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशननं दिला आहे. तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळावरील गर्दी तिसऱ्या लाटेसाठी कारणीभूत ठरेल, असंही सांगितलं आहे. पर्यटन, तीर्थयात्रा, धार्मिक उत्सव काही महिने नाही केलं तरी चालेल असंही आयएमएनं स्पष्ट केलं. वेळीच गर्दीवर नियंत्रण आणि करोनाची नियमावली पाळली नाही, तर तिसरी लाट लवकरच येईल अशी भिती आयएमएनं व्यक्त केली आहे.
तिसरी लाट येणार हे निश्चित आहे. मग यासाठी सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे. देशातील अनेक भागात सरकार आणि नागरिक नियमावली पाळताना दिसत नाही. करोनाचे नियम तुडवड गर्दी केली जात आहे. पर्यटनक्षेत्र पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेली आहेत. तीर्थयात्रा, धार्मिक उत्सव हे सर्व गरजेचं आहे. मात्र काही महिने थांबल्यास करोनाची तिसरी लाट थोपवता येईल”, असं इंडियन मेडिकल असोसिएशननं सांगितलं आहे. ओडिशातील पुरीमध्ये वार्षिक रथयात्रा उत्सव आणि उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये कावड यात्रेला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आयएमएच्या वक्तव्याकडे गंभीरतेनं पाहण्याची आवश्यकता आहे.
भारतात रविवारी ३७ हजार १५४ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे. देशातील एकूण बाधितांची संख्या आता वाढून ३ कोटी ८ लाख ७४ हजार ३७६ झाली आहे. त्यापैकी उपचार घेणाऱ्यांची संख्या ही रूग्णांची संख्या १.४६ टक्के आहे. सध्या भारतात ४ लाख ५० हजार ८९९ सक्रिय रुग्ण आहेत. तर देशात अद्याप अशी पाच राज्ये अशी आहेत जिथे सर्वात जास्त रुग्ण आढळून येत आहेत. केंद्र सरकारने याबाबत चिंता व्यक्त करत या राज्यांमध्ये केंद्रीय आरोग्य पथक पाठवण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार म्हणाल्या की, करोना रुग्ण वाढत असलेल्या राज्यांमध्ये केंद्र सरकारने यापूर्वीच आपले पथक पाठविले आहेत. ज्या राज्यांमध्ये करोना बाधितांमध्ये घट होत नाही आहे त्यात महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश यांचा समावेश आहे.