केंद्रात नवीन सहकार खाते निर्माण,कार्यभार अमित शाह कडे
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
11 July : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलेला असून यावेळी नव्याने सहकार खातंही तयार करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे या खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासोबत गृहमंत्रीपदाची जबाबदारीही कायम ठेवण्यात आली आहे. दरम्यान अमित शाह यांच्याकडे मंत्रीपद गेल्याने राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या राज्यातील सहकार क्षेत्रामध्ये राष्ट्रवादीचा दबदबा आहे. अशाच अमित शाह यांच्याकडे सहकार खात्याचा कार्यभार देण्यात आल्याने राज्यातील सहकार चळवळीत मत्तेदारी असलेल्या राष्ट्रवादीच्या अडचणी वाढतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे.केंद्राच्या सहकार खात्यामुळे महाराष्ट्रात गंडांतर येण्याच्या चर्चेत तथ्य नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट सांगितलं आहे. “सहकार कायदे बनवण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे.
त्यानुसार महाराष्ट्राच्या विधानसभेने कायदे केले आहेत. विधानसभेने केलेल्या कायद्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार केंद्र सरकारला नाही. केंद्र सरकार महाराष्ट्रातल्या सहकारी चळवळीवर गंडांतर आणेल या बातम्यांना फारसा अर्थ नाही,” असं शरद पवारांनी म्हटलं आहे. सहकार हा विषय घटनेनुसार राज्य सरकारचा आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.“मल्टीस्टेट बँका हा प्रकार केंद्राच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे सहकार मंत्रालय हा नवीन विषय नाही. मी दहा वर्षे कृषी खातं सांभाळत होतो, तेव्हाही हा विषय होता आणि आताही आहे,” असं शरद पवारांनी सागितलं. दुर्देवाने महाराष्ट्रातील माध्यमांनी या खात्यामुळे राज्यातील सहकार चळवळीवर परिणाम होईल, असं भासवलं आहे. त्यात काही तथ्य नाही, असंही त्यांनी सांगितलं.