भारत

आता झिका विषाणूचा ‘या’ राज्यात प्रादुर्भाव

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

11 July : करोनाचं संकट कायम असताना केरळमध्ये गेल्या काही दिवसात झिका विषाणूंचे रुग्ण आढळून येत आहेत. ही संख्या आता १४ वर पोहोचली आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून केंद्र सरकारने तज्ज्ञांची एक टीम माहिती घेण्यासाठी पाठवली आहे. या टीममध्ये ६ सदस्य असून परिस्थितीचा आढावा आणि राज्य सरकारला मदत करणार आहे. केंद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे.

केरळमधील १४ जणांचे अहवाल चाचणीसाठी पुण्यातील लॅबमध्ये पाठवण्यात आले होते. त्यात सर्व प्रथम एका गरोदर महिलेला झिका विषाणूची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर इतरांचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला होता.“झिका विषाणूचे काही रुग्ण केरळमध्ये आढळून आले आहेत. तिथल्या स्थितीचा अंदाज आणि राज्य सरकारला मदत करण्यासाठी सहा तज्ज्ञ सदस्याची एक टीम केरळमध्ये पाठवण्यात आली आहे.”, असं आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं.

दुसरीकडे, केरळच्या आरोग्यमंत्री वीना जॉर्ज यांनीही तातडीची पावलं उचलली आहेत. “सर्व जिल्ह्यांना झिका व्हायरसबाबत सूचना दिल्या आहेत. एडीस जातीचे मच्छर चावल्यानंतर झिका व्हायरसची लागण होते. त्या पार्श्वभूमीवर स्वच्छता आणि इतर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.”, असं आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितलं.एडीस जातीचा डास चावल्यानंतर झिका व्हायरसची लागण होते. या डासांची निर्मिती चांगल्या पाण्यात होते. या डासामुळे डेंग्यू, चिकनगुनिया आणि पिवळा ताप होण्याची देखील शक्यता आहे.

झिका व्हायरसचा सर्वाधिक धोका हा गर्भवती महिलांना असतो. विशेषत: याची लागण गर्भातील बाळाला होण्याची शक्यता असते. तसेच बाळाला विविध आजार देखील होण्याची शक्यता असते.ताप येणे, अंग दुखणे, तसेच अंगावर लाल रंगाचे चट्टे येणे हे झिका विषाणूची प्राथमिक लक्षणं आहेत. या दरम्यान प्रचंड डोकेदुखी होते, डोळे लाल होणे, अशक्तपणा आणि थकवा देखील जाणवतो. ही लक्षणं दोन ते सात दिवसापर्यंत कायम राहतात.

असं असलं तरी सुरुवातीला आलेल्या तापावरून झिका विषाणूची लागण झाल्याचं सांगणं कठीण आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचणी करुन निदान करणं आवश्यक आहे.डास चावण्यापासू संरक्षण करणे हाच सर्वात मोठा उपाय आहे. संशयित रुग्णांची वेळेवर चाचणी करणं गरजेचं आहे. हा व्हायरस डासांमुळे पसरत असल्याने तुमचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. तसेच डबकी किंवा घरात फार दिवस पाणी भरलेलनं राहणार नाही याची काळजी घ्या.