सिनेमा,मनोरंजन

सदाबहार अभिनेते दिलीप कुमार काळाच्या पडद्याआड

7 July :- बॉलिवूड सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. बॉलिवूडचे ज्येष्ठ सदाबहार अभिनेते दिलीप कुमार यांचे बुधवारी (७ जुलै) वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले आहे. प्रदिर्घ आजाराने त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.मागील अनक वर्षांपासून दिलीप कुमार यांची तब्येत खालावलेली होती. त्यांच्यावर सातत्याने उपचार करण्यात येत होते. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालावली आहे. अभिनेता दिलीप कुमार यांच्यावर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु होते, तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

बॉलिवूडला दिलीप कुमार यांनी एकापेक्षा एक असे चित्रपट दिले.त्यांनी सन १९४४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ज्वार भाटा’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटाला दुर्लक्षित करण्यात आले होते. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या ‘प्रतिमा’ (१९४५) आणि ‘नौकाडूबी’ (१९४७) हे चित्रपट सपशेल फ्लॉप ठरले होते. यानंतर त्यांनी ‘जुगनू’ (१९४७) या चित्रपटात काम केले. हा चित्रपट हिट झाला होता. यानंतर ‘शहीद’ (१९४८) चित्रपटही यशस्वी ठरला. यासोबतच ते स्टार म्हणून नावारुपाला आले.

कारकिर्दीत त्यांनी एकूण ६२ चित्रपटात काम केले. त्यातील ५ चित्रपटात त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली. त्यांनी एकूण ५७ चित्रपटात हिरो म्हणून काम केले. त्यात १९४७ ते १९९६ दरम्यान २५ चित्रपट फ्लॉप झाले. त्यात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारलेल्या २ चित्रपटांचा समावेश होता. त्यांनी १९४७ ते १९७४ दरम्यान ३० हिट चित्रपटात काम केले. यात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारलेल्या ३ चित्रपटांचा समावेश होता. याव्यतिरिक्त त्यांचे हिरो म्हणून २३ चित्रपट फ्लॉप आणि ३४ चित्रपट हिट ठरले. त्यांनी केलेल्या एकूण ६२ चित्रपटांमध्ये २५ फ्लॉप आणि ३७ हिट ठरले.