परिस्थितीचे भान ठेवून “महाबीज”चे भांडारशेतकऱ्यांना मोफत खुले करावे – पुजा मोरे
गेवराई, सोयाबीन बियाण्याची ३० किलो ची बॅग मागील हंगामात १८९० रुपयांपर्यंत विकली जात होती. यंदा ही किंमत ३६० रुपयांनी वाढवण्यात आली आहे. ही दरवाढ शेतकऱ्यांना परवडणारी नाही, म्हणून सरकारने महाबीजचे भांडार शेतकऱ्यांसाठी मोफत खुले करावे किंवा तात्काळ पॅकेजचे बियाणे उपलब्ध करून घ्यावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांनी केली आहे. राज्यात सोयाबीन हे प्रमुख पीक झालेले आहे. राज्यात जवळपास ३९ लाख हेक्टरपेक्षा अधिक सोयाबीन क्षेत्र आहे. यासाठी सोयाबीन उत्पादकांना लाखो क्विंटल बियाण्यांची गरज भासते. सोयाबीन हे स्वपरागसिंचित असल्याने दरवर्षी नवीन बियाणे विकत घेणे गरजेचे नसले तरी महाराष्ट्रात सोयाबीनचे ३० ते ४० टक्के दरम्यान नव्याने खरेदी होते. या बियाणे विक्रीत प्रामुख्याने महाबीजच्या वाटा असतो. हंगामात सोयाबीनच्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठी झळ सहन करावी लागली. असाच फटका बीजोत्पादनालाही बसला आहे. बियाणे कंपन्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे सहाजिकच बियाणे उत्पादनात वाढ झाली, यामुळे बियाणे उत्पादक कंपन्यांनी आता दरवाढ केली आहे. महाबीज बियाण्यांच्या ३० किलो वजनाची बॅग मागील वर्षी पेक्षा ३६० रुपयांनी यंदा महागली आहे. मागील वर्षात १८९० ला मिळणारी बॅग २२५० रुपयांपर्यंत पोहचली आहे. म्हणून किलोला ७५ रुपयांना दर चुकवावा लागणार आहे, तर काही खासगी बियाणे कंपनीचे दर प्रति बॅग २४०० किंवा त्यापेक्षा अधिक झाले असून ही शेतकऱ्यांची लूट आहे असेही पुजा मोरे यांनी आमचे पत्रकार सुभाष मुळे यांच्याशी बोलताना सांगितले. मागील वर्षी परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले, यामुळे सोयाबीन बियाण्याचीही प्रत खालावली होती. याची झळ आता आगामी खरिपाच्या हंगामात शेतकऱ्यांना सोसावी लागत आहे. सोयाबीनचे बियाणे क्विंटल मागे एक हजार रुपयांपेक्षा अधिक महागले आहे. प्रामुख्याने महाबीजच्या बियाणांचा दर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. या कोरोनाच्या अडचणीच्या काळात सरकारने महाबीजचे भांडार शेतकऱ्यांसाठी मोफत खुले करणे अपेक्षित होते मात्र त्या उलट त्यांनी दरवाढ केली आहे, म्हणून सरकारने महाबीजचे भांडार शेतकऱ्यांसाठी मोफत खुले करावे किंवा शेतकऱ्यांना पॅकेजचे बियाणे उपलब्ध करून घ्यावे आणि खाजगी कंपन्यांच्या भाववाढीवर निर्बंध घालावे अशी मागणी पूजा मोरे यांनी केली आहे.