महाराष्ट्र

तळीरामांची चंद्रपुरात दिवाळी

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

5 July : चंद्रपूर जिल्ह्यातील मद्यप्रेमींसाठी सोमवारचा दिवस हा आनंदाचा ठरला. सहा वर्षाच्या प्रतिक्षेनंतर बिअर बार, देशी-विदेशी दारूची दुकाने, बिअर शॉपी सुरू होताच मद्यप्रेमींनी मद्य खरेदीसाठी गर्दी केली होती. तर, करोना नियमावलीमुळे सायंकाळी चार वाजताच मद्यालये बंद होणार असल्याने बिअर बार समोर मद्यप्रेमींची मोठी गर्दी दिसून आली.राज्यात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार असताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी केली होती.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दारूमुक्ती अभियानाच्या माध्यमातून श्रमिक एल्गारच्या संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी दारूबंदीच्या विरोधात अभियान सुरू केल्यानंतर राज्य सरकारने दारूबंदीचा निर्णय घेतला होता. मात्र ही दारूबंदी पूर्णत: अयशस्वी ठरली. गल्लीबोळात तथा भ्रमणध्वनीवर दारू मिळू लागल्याने पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात आघाडी सरकार येताच, दारूबंदी मागे घेण्याची घोषणा केली. विशेष म्हणजे केवळ घोषणा न करता दारूबंदी मागे घेत त्याची अंमलबजावणी केली

.दारूबंदी उठविताच मागील एक महिन्यापासून परवाना नुतनीकरणाचे काम उत्पादन शुल्क विभागाच्या माध्यमातून सुरू होते. दारू विक्री परवान्यात ६४ परमिट रूम, १ वाइन शॉप, २६ देशी दारू दुकाने, ६ बिअर शॉपी व १ क्लबला मंजूरी मिळताच, सोमवारी काही बिअर बार व देशी दारूची दुकाने सुरू झाली. पोलीस मुख्यालया समोरील हॉटेल सिध्दार्थ, हॉटेल तंदूर, हॉटेल पॅलेस, हॉटेल मोतीमहल, मनोरंजन तथा इतर अन्य बिअर बार आणि देशी दारूची दुकाने सुरू झाली.

पहिल्याच दिवशी वेळेत दारू पोहचू न शकल्याने सकाळी सुरू होणारी मद्यालये दुपारी तीन वाजेच्या सुमारास सुरू झाली. तर, करोना नियमावलीमुळे सायंकाळी ४ वाजता ही दुकाने बंद करण्यात आली.आज पहिल्याच दिवशी मद्यप्रेमींनी बिअर बारमध्ये गर्दी केली. आता हळूहळू एकेक बिअर बार नियमित सुरू होईल असे उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने सांगण्यात आले. काही मद्यप्रेमींनी तर रस्त्यावर उतरून आनंद साजरा केला.