यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट; राज्य सरकारने नियमावली केली जाहीर
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
29 Jun :- अवघा महाराष्ट्र आपल्या लाडक्या गणपती बाप्पांच्या आगमणाची आतुरतेने वाट पाहत आहे. लवकरच घराघरात गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यावेळीही देखील गणपती उत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे सरकारकडून गणेशोत्सवासंदर्भात काय निर्णय घेणार याविषयी सर्वाच वाट पाहत होते. अखेर ठाकरे सरकारकडून यंदाच्या गणेशोत्सवासंदर्भात नियमावली जाहीर केल्या आहेत. गृहविभागाने गणेशोत्सव साजरा करण्याविषयी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. यामध्ये गेल्या वर्षीसारखेच नियम यंदाही लागू केले आहेत. गणेश मंडपात गर्दी टाळावी असे आवाहन करण्यात आले आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी परवानगी आवश्यक केली जाणार आहे. यासोबतच सार्वजनिक गणेशमूर्ती 4 फूटांची आणि घरगुती गणेश मूर्तीची उंची 2 फुटांची असावी असेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे.
या आहेत मार्गदर्शक सूचना
गणेशोत्सवासाठी महामंडळांनी महापालिका वा स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे.
कोरोनामुळे महापालिका वा स्थानिक प्रशासनाने ठरवलेल्या धोरणानुसार मर्यादित स्वरूपातच मंडप उभारावा लागेल.
गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा.
सार्वजनिक गणेश मंडळातील मूर्तीची उंची 4 फूट आणि घरातील मूर्तीची उंची 2 फुटांपेक्षा जास्त उंच असू नये.
यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू किंवा संगमरवर अशा मूर्तींचे पूजन करावे.
मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचं विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावं. असे करणे जर शक्य नसेल तर जवळच्या कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यात यावे.
स्वच्छेने देणगी दिली तरच स्विकारावी.
जाहिरातींमुळे गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. आरोग्य विषयक आणि सामाजिक संदेश देणाऱ्या जाहिराती करण्याला प्राधान्य द्यावे.
सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याऐवजी आरोग्यविषयक उपक्रम वा शिबिरे घेण्याता यावीत. स्वच्छतेबाबत जनजागृती केली जावी.
राज्य सरकारने लागू केलेले निर्बंध गणेशोत्सवातही कायम असतील. शिथिल केले जाणार नाहीत.
आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. ध्वनी प्रदुषणाचे नियम पाळावेत.
श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था केली जावी.
गणपती मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था उपलब्ध करावी.
आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढल्या जाऊ नयेत. विसर्जन स्थळी करण्यात येणारी आरती घरीच केली जावी. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी विसर्जन स्थळावर जाऊ नये.
चाळीतील आणि इमारतीतील गणेशमूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्र काढू नये.
महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने गणेशमूर्तीच्या विसर्जनाकरता कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी.