कोकणात रेल्वे मार्गावर मोठी दुर्घटना टळली
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
26 june : आज कोकणात जाणार्यांचा मोठा खोळंबा झाला आहे. आरामदायी आणि वेगवान प्रवास म्हणून अनेकजण रेल्वे प्रवासाची निवड करतात. पण आज कोकण रेल्वेच्या रत्नागिरी जिल्ह्यातील भोके आणि उक्षी या स्थानकादरम्यान हजरत निजामुद्दीन – मडगाव जंक्शन राजधानी एक्सप्रेसला अपघात झाल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. राजधानी एक्सप्रेस रूळावरून घसरली आहे त्यामुळे हा खोळंबा झाला आहे.
सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र वाहतूक विस्कळीत झाली आहे.सकाळी सव्वा चारच्या सुमारास हजरत निजामुद्दीन ते मडगाव या राजधानी एक्सप्रेसच्या इंजिनचं चाक सरकलं आणि वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान सध्या कोकण रेल्वे मार्गावर काही निवडक गाड्या धावत आहेत त्या एकापाठोपाठ एक थांबल्या आहेत. आज एकीकडे मुंबई- गोवा मार्गावर वशिष्ठी नदीच्या पुलावरील कामामुळे रस्ते वाहतूक देखील मंदावली असल्याने आता रेल्वे देखील खोळंबल्याने अनेकांना तिष्ठत राहावे लागत आहे. मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण येथे वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या आहेत.
दरम्यान पावसाचे दिवस असल्याने सध्या कोकण रेल्वे मार्गावर 10 जून पासून नव्या मान्सून स्पेशल वेळापत्रकानुसार ट्रेन्स चालवल्या जात आहेत. त्यामुळे भल्या पहाटे मुंबईत येणार्या काही गाड्या देखील स्टेशन मध्ये विविध स्थानकांत अडकल्या आहेत. रेल्वे प्रशासनाकडून अपघाताची माहिती मिळताच तातडीने इंजिन हटवत रेल्वे सेवा सुरळीत करण्याच्य कामाला सुरूवात झाली आहे आणि वाहतूक लवकरच सुरू होईल असे देखील सांगण्यात आले आहे.