महाराष्ट्र

ठाकरे सरकारचे ‘या’ नेत्याकडून कौतुक

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

26 June : कोल्हापूर येथे पार पडलेल्या लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सारथी संस्थेच्या कोल्हापूरमधील उपकेंद्राचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झालं. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती, त्यांचे वडील छत्रपती शाहू महाराज, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हे उपस्थित होते. या उद्घाटन कार्यक्रमानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी ठाकरे सरकारचं जाहीर कौतुक केलं.

केवळ चर्चा न करता निर्णयही झाला, सारथी उपकेंद्राला जमीन मिळाली, त्याबद्दल ठाकरे सरकारचे कौतुक आणि आभार मानतो असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले. “सारथीच्या उद्घाटनावेळी 4 वर्षापूर्वी मी उपस्थित होतो. सारथीला स्वायत्तता राहायला हवी ही आमची मागणी होती. एका अधिकाऱ्यामुळे ती गेली होती. चर्चा असो की संघर्ष आम्ही सर्व केलं. महाविकास आघाडी सरकार असो, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. आरक्षणाचा लढा सुरुच राहील, वर्ष लागेल दोन वर्ष लागेल.

पण समाजाला सक्षम करायचं असेल तर सारथी संस्था स्वत:च्या पायावर उभी राहणं आवश्यक आहे. त्यासाठीच तिची स्थापना झाली. परवा माझी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राजे आम्ही तुमच्यासोबत आहोत, दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्र्यांनी पुण्यात बैठक घेतली, त्यात बहुतेक प्रश्न निकाली लागले” असं संभाजीराजे म्हणाले.प्रामुख्याने शाहूंच्या कर्मभूमीत सारथीचं उपकेंद्र देण्याचा निर्णय घेतला, केवळ निर्णय झाला नाही तर दोन सव्वा दोन एकर जमीन आणि इमारत हस्तांतरही झाली. मी आज सरकारचं कौतुक आणि आभार मानले. मी सांगितलं सारथीला अद्ययावत संशोधन केंद्र करायचं असेल तर त्यासाठी किमान पाच एकर जमीन हवी. मला विश्वास आहे सुरुवात चांगली झाली आहे, यापुढेही चांगलं काम होईल आणि खऱ्या अर्थाने शाहूंचा विचार सर्वदूर पोहोचेल, असं संभाजीराजे यांनी सांगितलं.’