निर्मल मिल्खा सिंह यांचं करोनामुळे निधन
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
jun 13 :भारताचा महान धावपटू मिल्खा सिंह यांच्या पत्नी निर्मल मिल्खा सिंह यांचं करोनामुळे निधन झालं आहे. त्या ८५ वर्षांच्या होत्या. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिल्खा सिंह यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याने ते अंत्यसंस्काराला उपस्थित राहु शकले नाही. करोना प्रोटोकॉल अंतर्गत निर्मल सिंह यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने निर्मल सिंह यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. २६ मे रोजी त्यांना मोहालीच्या फोर्टीज रुग्णालयात भरती करण्यात आलं. ३० मे रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सामान्य कक्षातून आयसीयू वॉर्डमध्ये हलवण्यात आलं होतं. मात्र तिथेही त्यांची ऑक्सिजन लेव्हल झपाट्याने कमी होत असल्याचं दिसून आलं. डॉक्टरांनी अथक प्रयत्न केल्यानंतरही त्यांचे प्राण वाचवण्यात अपयश आलं. निर्मल सिंह या पंजाब सरकारमध्ये खेल मार्गदर्शक आणि भारतीय महिला राष्ट्रीय वॉलीबॉल संघाच्या माजी कर्णधार होत्या.
दरम्यान, मिल्खा सिंह यांना १९ मे रोजी करोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना २४ मे रोजी फोर्टीज रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना ३० मे रोजी कुटुंबाच्या आग्रहाखातर घरी सोडण्यात आलं. त्यानंतर त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. गुरुवारी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिल्खा सिंह यांना ताप आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. रुग्णालयात मिल्खा सिंह यांच्यावर उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.