राजकारण

उद्धव ठाकरेंनी बॅक टू पॅव्हेलियन यावं, फडणवीसांना मुख्यमंत्री करावं

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

9 Jun :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मोदींशी बंद दाराआडही चर्चा केली. रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोदी-ठाकरे भेटीवर मोठं विधान केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी बॅक टू पॅव्हेलियन यावं. भाजपसोबत सत्ता स्थापन करावी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं, अशी सादच रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांना घातली आहे. उद्धव ठाकरेंना माझा प्रस्ताव आहे. त्यांनी बॅक टू पव्हेलियन यावं. भाजपसोबत सरकार स्थापन करावं. शिवसेना, भाजप आणि आरपीआयची युती महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने नेणारी आहे, असं आठवले म्हणाले.

शिवसेना आणि भाजपची 30 वर्षांपासूनची मैत्री होती. उद्धव ठाकरे यांनी या मैत्रीचा विचार करावा. भाजपसोबत यावं आणि मोठ्या मनाने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची काल भेट झाली. या भेटीमधून राज्याला बऱ्याच अपेक्षा आहेत, असं ते म्हणाले. दरम्यान, आठवले यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी रिपाइं नेते अविनाश महातेकरही त्यांच्यासोबत होते. ही अनौपचारिक भेट होती. या भेटीत मराठा, ओबीसी, मुस्लिम आणि धनगर आरक्षणावर चर्चा झाली.

देशभरातील क्षत्रियांनाही आरक्षण मिळावं याबाबतही चर्चा करण्यात आली. त्याशिवाय पदोन्नतीतील आरक्षणावरही चर्चा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. मराठा आरक्षणासाठी 50 टक्क्यांची मर्यादेची अट शिथिल करण्यासाठी संविधानात दुरुस्ती करायला हवी. त्यासाठी दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी सर्व पक्षीयांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत, या मुद्द्यावर पवारांनी सहमती दर्शविल्याचंही त्यांनी सांगितलं. पदोन्नतीमधील आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकारशी चर्चा करून अनुकूल निर्णय घेण्याचे आश्वासनही पवारांनी दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.