चिमुकलीवर बिबट्याच्या हल्ला
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
4 Jun :- गुरुवारी सायंकाळी 5 वर्षांच्या चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. घराबाहेर खेळणारी आधा शकील बेपत्ता झाल्यानंतर तिला बिबट्याने पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला जात होता. अखेर दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह आढळल्याने ही भीती खरी ठरली. आधाच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शकील अहमद हे काश्मीरमधील ओमपोरा भागातील रहिवासी आहेत. त्यांची पाच वर्षांची मुलगी आधा शकील गुरुवारी सायंकाळपासून बेपत्ता होती. त्यासाठी सोशल मीडियावरुनही शोध मोहीम राबवली जात होती.
आधाला बिबट्याने पळवल्याची खात्री झाल्यानंतर पोलिस, वन्यजीव पथकं आणि सैन्य दलाने तात्काळ पावलं उचलली. बेपत्ता चिमुरडीचा शोध घेण्यासाठी मोठी शोध मोहीम सुरु होती. मात्र दुर्दैवाने शुक्रवारी सकाळी तिचा मृतदेह जवळच्या झुडपात सापडला. सुरुवातीची शोधाशोध सुरु असताना स्थानिकांना रक्ताच्या खुणा सापडल्याने बिबट्याने आधाला नेले असावे, असा संशय व्यक्त झाला होता. नंतर जवळच्या झाडाझुडपात मुलीच्या शरीराचे भाग सापडल्यामुळे त्यांची भीती खरी ठरली.
दाट झाडीजवळ कॉलनी वसलेली असल्याने या भागात बिबट्या दिसण्याची ही पहिलीच घटना नाही. गेल्या काही दिवसांपासून बिबट्या या भागात फिरताना दिसतो, मात्र वन्यजीव अधिकाऱ्यांनी आपल्या मदतीसाठी काहीच केले नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. आम्ही वन्यजीव अधिकाऱ्यांकडे बरेच वेळा याकडे लक्ष देण्यासाठी विनंती केली आहे. ही झाडी आता घनदाट झाल्यामुळे अशा भयानक घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्यांनी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे, असं स्थानिक म्हणतात. आधा बेपत्ता झाल्यानंतर ट्विटरवरुनही शोधाशोध सुरु झाली होती.