News

पोलिसांनी पुलवामासारखा मोठा कट हाणून पाडला, एका कारमधून जप्त केली 20 किलो स्फोटके

श्रीनगर. जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा दलांनी पुलवामासारखा दहशतवादी हल्ल्याचा कट हाणून पाडला. पुलवामा जिल्ह्यात एका पांढल्या रंगाच्या सेंट्रो कारमधून 20 किलो आयईडी (सुधारित स्फोटक यंत्र) जप्त केले. यानंतर वेळेआधी ते नष्ट केले. ही कार पुलवामातील राजपुरा रोडवर शादीपुरा येथे मिळाली.

सुत्रांनी सांगितले की, काही दहशतवादी स्फोटकांनी भरलेल्या कारमधून जात असल्याची माहिती पुलवामा पोलिसांना बुधवारी उशिरा रात्री माहिती मिळाली. याद्वारे काही ठिकाणी दहशतवादी हल्ले केले जाऊ शकतात. सुरक्षा दलाने तातडीने कारवाई करून सर्व मार्ग सील केले. यावेळी एक संशयास्पद कार दिसली. थांबवल्यानंतर गोळीबार करण्यात आला. यानंतर चालक अंधाराचा फायदा घेत फरार झाला. सुरक्षा दलाने कार जप्त केली आहे. हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी ही कार चालवत होता असे सांगितले जात आहे.

मागच्या सीटवर ड्रम ठेवले होते

> सुरक्षा दलांनी कारजवळ जाऊन पाहिले असता, मागील सीटवर स्फोटकांनी भरलेले निळ्या रंगाच्या ड्रम ठेवले होते.

> सुरक्षा दलांनी रात्रभर कारचे परीक्षण केले. यानंतर आसपासच्या घरांना खाली केले. त्यानंतर ते वाहन उडवून दिले. सुत्रांनुसार मोठा हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट होता.

> कारवर स्कूटरची नंबर प्लेट लावली होती. त्याची नोंदणी कठुआ जिल्ह्यात असल्याची माहिती मिळत आहे.

पुलवामा हल्ल्यात 350 किलो आयईडीचा वापर करण्यात आला होता

> 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामाच्या अवंतीपुरा भागात सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. गोरीपुरा गावाजवळ झालेल्या या हल्ल्यात 44 जवान शहीद झाले होते.

> आत्मघाती बॉम्बरने स्फोटकांनी भरलेल्या गाडीने सीआरपीएफच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसला धडक दिली होती. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. पुलवामा हल्ला हा काश्मीरमधील 30 वर्षांचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी 350 किलो आयईडीचा वापर केला होता.