महाराष्ट्र

शरद पवार आणि फडणवीस यांची मुंबईत भेट; राजकीय चर्चांना उधाण

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

31 May :- विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज 31 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. मुंबईतील ‘सिल्वर ओक’ या शरद पवार यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. ही सदिच्छा भेट असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. या भेटीची माहिती त्यांनी स्वत: ट्वीट करुन दिली आहे. परंतु महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती पाहता या दोन दिग्गज नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांच्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या होत्या. आजारपणातून बाहेर पडल्यानंतर शरद पवार पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी ही सदिच्छा भेट असल्याचं म्हटलं असलं तरी त्यांच्यात राजकीय चर्चा झालीच असावी, अशी चर्चा रंगू लागली लागली आहे. अवघ्या दहा मिनिटांची ही भेट होती.

दरम्यान “देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच शरद पवार यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर शरद पवार यांनी भेटण्यासाठी वेळ दिली असावी. पवार यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठीच फडणवीस गेले असतील,” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. राज्यात सध्या वेगवान घडामोडी घडत आहेत. त्यातील प्रमुख मुद्दा म्हणजे मराठा आरक्षण. फडणवीस आणि पवार यांच्या भेटीत या मुद्द्यावरही चर्चा झाली असावी अशी अटकळ बांधली जात आहे.