महाराष्ट्र सरकारने 250 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्याचा घेतला निर्णय
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
26 May :- गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावरील जिल्ह्यांना तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसून मोठे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाईल, अशी महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. अशातच या चक्रीवादळग्रस्तांसाठी 250 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याबद्दलचा शासन निर्णय उद्या जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बोलताना सांगितलं की, “सात जिल्हांत चक्रीवादळाचा परिणाम झाला. एनडीआरएफच्या निकषांच्या पलीकडे जाऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. एनडीआरएफच्या निकषानुसार ‘तोक्ते’ चक्रीवादळात 72 कोटी रुपयांचे नुकसान झालं आहे. पण महाराष्ट्र सरकारने 250 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यातील वादळांचा मुकाबला करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचाही निर्णय झाला आहे. त्यासाठी कोकण किनारपट्टीवरील गावांमध्ये विजेच्या भूमिगत वायर टाकण्यात येणार आहेत, निवारेही बांधण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेऊन या सर्व कामांची आवश्यकता वर्तवली असून त्यांचे प्रस्ताव मागवले आहेत.” तसेच तोक्ते चक्रीवादळासंदर्भात काल बैठक घेण्यात आली आणि उद्याच्या कॅबिनेट बैठकीनंतर यासंदर्भातला शासन निर्णय काढण्याचं बैठकीत ठरवण्यात आलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, 21 मे रोजी मुख्यमंत्र्यांनी स्वतः कोकण दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला होता आणि तात्पुरती घोषणा न करता आढावा घेऊन व्यवस्थित मदत दिली जाईल आणि कुणालाही वंचित ठेवणार नाही असं आश्वस्त केले होते. त्याप्रमाणे त्यांनी निसर्ग चक्रीवादळाप्रमाणे मदत दिली जाणार असल्याची घोषणा केली होती. आज तोक्ते चक्रीवादळातल्या नुकसानग्रस्तांसाठी 250 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.