मराठवाडा

कलेक्टर, एसपी ऑफिस बॉम्बने उडवण्याची धमकी

आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली अटक

24 May :- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ई-मेल आयडीवर ८ मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास एक मेल आला. त्यामध्ये शासकीय कार्यालयांसह संपूर्ण नांदेड शहर बॉम्बने उडवून टाकीन, असा संदेश लिहिलेला होता. जिल्ह्यातील १२५ जागी हॉटस्पॉट निवडले असून बाॅम्ब फुटायला तयार आहेत, अशी धमकी होती. सोबतच त्याने नांदेडच्या सर्व कार्यालयांची यादी जोडली होती. घडलेला प्रकाराबाबत पाेलिसांकडून गुप्तता बाळगण्यात आली. पण, यावर तपासणी सुरू होती.

तांत्रिक मदतीने हा मेल पाठवणाऱ्याची माहिती काढण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्यावर साेपवण्यात अाली. त्यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक आशिष बोराटे, पोलिस अंमलदार गंगाधर कदम, बजरंग बोडके यांनी याप्रकरणी विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत संपर्क साधून हा मेल पाठवणाऱ्याची माहिती मिळवली. आरोपी शेख अब्दुल रफिक अब्दुल रऊफ वय ३५, व्यवसाय व्यापारी, रा.आगापुरा, अर्धापूर, जि.नांदेड यास रविवारी अटक केली. पोलिस उपनिरीक्षक आशिष बोराटे यांच्या तक्रारीवरून वजिराबाद पोलिस ठाण्यात सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.