‘या’ जिल्ह्यात अनलॉक सुरु
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
19 May :- राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या रुग्णसंख्येत आता काहीशी घट होताना दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात 20 मे पासून अनलॉक प्रक्रिया सुरु करण्यात येत असून अनेक निर्बंधात शिथिलता आणण्यात येत असल्याचं जिल्हाधिकारी रामामुर्ती यांनी स्पष्ट केलंय. या संबंधी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे एक परिपत्रक काढण्यात आलं आहे. हे नवीन नियम 20 मे सकाळी 6 वाजल्यापासून ते 1 जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असतील. या नव्या नियमांनुसार, जिल्ह्यातील सर्व प्रकारची जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा मालाची दुकाने तसेच स्वस्त धान्यांची दुकाने सकाळी 7 ते 11 वाजायच्या दरम्यान सुरु राहतील.
भाजीपाला आणि फळविक्रीही सकाळी 7 ते 11 वाजण्याच्या दरम्यान सुरु राहतील. दुध व दुग्धजन्य पदार्थाची विक्री ही सकाळी 6 ते 9 आणि संध्याकाळी 6 ते रात्री 9 या दरम्यान सुरु राहणार आहे. तसेच सर्व प्रकारच्या कृषी सेवा केंद्र आणि कृषी निविष्ठांची दुकाने, कृषी प्रक्रिया उद्योग, शेती अवजारे आणि शेतीतील उत्पादनांशी संबंधित दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. या बाबतचे नियोजन हे तालुका कृषी अधिकाऱ्यांनी करायचे आहे. सर्व राष्ट्रीयकृत बँका आणि बँकिंगशी संबंधित सर्व संस्था या सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहतील असं या आदेशात म्हटलं आहे. तर रेस्टॉरन्ट, भोजनालयं आणि उपहार गृहे ही केवळ होम डिलिव्हरीसाठी सुरु राहतील. त्यांची वेळ सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत अशी असेल.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे काम हे 23 मे पर्यंत बंद राहणार असून त्यानंतर टोकन पद्धतीने नियोजनाची जबाबदारी जिल्हा उपनिबंधक सहसंस्थांनी करायची आहे. उपरोक्त कालावधी शिवाय कोणत्याही व्यक्तीला अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय कारणाशिवाय बाहेर पडण्यास मनाई आहे असा आदेश काढण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व उद्याने बंद असतील आणि मॉर्निंग वॉकला मनाई आहे असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था या बंद राहतील अस स्पष्ट करण्यात आलं आहे.या काळात सार्वजिनक समारंभांवर बंदी असेल. लग्न संमारंभाचे आयोजन करायचे असेल तर ते घरघुती पद्धतीने करावं लागेल असं या आदेशात सांगण्यात आलं आहे. वरील नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.