बीड

पंतप्रधान मोदी बुधवारी मुंबई दौऱ्यावर; चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची करणार हवाई पाहणी

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

18 May :- पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (19 मे) मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात झालेल्या नुकसानीची ते हवाई पाहणी करणार आहेत. पंतप्रधानांचा मुंबई दौरा धावता असला आणि ते फक्त विमानातूनच पाहणी करणार असले, तरी राज्यात त्यामुळे राजकारणाला वेग आल्याचं वातावरण आहे. मंगळवारी संध्याकाळी राज्यातले जवळपास सर्व प्रमुख राजकीय नेते कुठल्या ना कुठल्या बैठकीत होते. सत्ताधारी आणि विरोधक वेगवेगळ्या तीन महत्त्वाच्या बैठकांमध्ये सक्रिय होते. राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक मंगळवारी संध्याकाळी झाली. तसंच विरोधी पक्षांची एक बैठकही देवेंद्र फडणवीसांनी घेतली. उद्या म्हणजे 19 मे रोजी कॅबिनेट बैठक आहे. त्यामध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय व्हायची शक्यता आहे.

महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत कशावर चर्चा झाली ते सांगताना कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “काही अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत चर्चा झाली. महामंडळ आणि समिती नेमणुकीचीही चर्चा झाली. अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील.” Covid-19 च्या परिस्थितीमुळे बैठक होऊ शकली नव्हती, असंही शिंदे म्हणाले. या बैठकीला अजित पवार, सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे , अशोक चव्हाण आदी नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री मात्र या बैठकीत नव्हते, असं समजतं. त्यांची अनिल परब यांच्याबरोबर दुसरी बैठक सुरू होती. तत्पूर्वी दुपारी काँग्रेस नेते आणि कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणासंदर्भात पत्रकार परिषद घेतली.

सुप्रीम कोर्टचा निर्णय आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार समितीची बैठक झाली. 31 मे रोजी ही समिती अहवाल देईल, त्यानंतर मराठा आरक्षणाविषयी राज्य सरकारची पुढची भूमिका ठरेल, असं चव्हाण म्हणाले. भाजप मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार यावर चव्हाण मोदींच्या मुंबई पाहणी दौऱ्याची आठवण करत म्हणाले, “भाजप नेत्यांनी आंदोलन करण्यापेक्षा पंतप्रधानांना भेटावं. दुसरीकडे मंगळवारी संध्याकाळी विरोधी गोटातही खलबतं सुरू होती. देवेंद्र फडवणीस यांच्या सागर बंगला इथे झालेल्या बैठकीला चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर यांच्यासह गिरीश महाजन, नरेंद्र पाटील, हर्षवर्धन पाटील उपस्थितीत होते. भाजपच्या या बैठकीला खासदार नारायण राणे, खासदार रणजितसिंह निंबाळकर, विनायक मेटे हे ही उपस्थित असल्याची माहिती कळते.