News

‘सगळ्याच गोष्टीत झेंडे लावण्याची गरज नाही’, गडकरींनी टोचले फडणवीसांचे कान!

नागपूर, 10 मे : ‘आपण सगळ्याच गोष्टीमध्ये बोर्ड लावले पाहिजे, झेंडे लावले पाहिजे, याची गरज नाही. लोकांना सगळं काही माहिती आहे.  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासह सर्वांनाच माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे, यात राजकारण करू नका’ अशा शब्दांत भाजपचे (BJP) नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी भाजपच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांचे चांगलेच कान टोचले.

कोरोना (Corona) परिस्थितीचा आढावा घेत काय उपाययोजना करता येईल, यासाठी भाजप महानगर कार्यकारिणीची बैठक पार पडली. शनिवारी या बैठकीची सांगता झाली. यावेळी भाजपच्या नेत्यांना मार्गदर्शन करत असताना नितीन गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच नेत्यांना सबुरीचा सल्ला दिला.

‘कोरोनाच्या काळात आपल्याला कार्यकर्ता गमावणे हे न परवडणारे आहे. अनेक कार्यकर्ते आपण आतापर्यंत गमावले आहे. पक्षाची कामं होत राहतील, पण तुमचा जीव वाचला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे, पुढे अनेक कामं करता येईल. त्यामुळे हात जोडून विनंती आहे, तुमची आणि कुटुंबाची काळजी घ्या, ज्यांनी लस घेतली नाही, त्यांनी लस घ्यावी, लोकांना लसीकरण केंद्रावर नेण्यास मदत करावी, कुणाचं झालं नाही, याची काळजी घ्यावी’ अशी विनंतीही गडकरींनी केली, 

‘यात राजकारण करू नये, आपण सगळ्याच गोष्टीमध्ये बोर्ड लावले पाहिजे, झेंडे लावले पाहिजे, याची गरज नाही. लोकांना माहिती आहे. यावेळी लोकांना आपण राजकारण केलं तर लोकांना हे आवडणार नाही. तुम्ही जे काही चांगले काम केले, ते लोकांपर्यंत पोहोचणारच आहे. त्याचे क्रेडीट आपोआप तुम्हाला आणि पक्षाला मिळणार आहे’ असं म्हणत गडकरी यांनी नेत्यांना खडेबोल सुनावले.

देवेंद्र फडणवीस हे नुकतेच गडचिरोलीचा दौरा करून आले आहे. दौरा करणे ठीक आहे. पण आताच्या परिस्थिती खूप गरजेचं असेल तरच जावे, गाडीत किती लोकं बसणार आहे, लोकांमध्ये किती मिसळायचे याचा विचार करावा. शक्यतो व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधवा, हल्ली तर मोबाईलवरही सहज शक्य आहे, अशी सूचनाही गडकरींनी केली.

‘आपण जे काम करतोय, ते वृत्तपत्र, सोशल मीडिया आणि टीव्हीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतच आहे. आपण जे करतोय, त्याची माहिती लोकांना मिळणे याचा बागुलबुवा करणे हे योग्य नाही. मी फोटो पाहिलेत की, एका ठिकाणी एकच ऑक्सिजन सिलेंडर देत असताना चार जण फोटो काढून शेअर करत आहे, असं काही करू नका. आपल्याबद्दलची प्रतिमा ही वाईट होईल, असंही गडकरींनी कार्यकर्त्यांनी बजावले.

‘आपण नेहमी सांगत आलोय, ‘मनसा सततम् स्मरणीयम्. वचसा सततम् वदनीयम्. लोकहितम् मम करणीयम्’, म्हणजे, राजकारण हे सत्ताकारण नाहीये. समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण म्हणजे राजकारण आहे, हे खरं राजकारण आहे. नुसत्या निवडणुका लढवणे आणि सत्तेत जाणे एवढंच त्याचा हा भाग नाही’ असंही गडकरी म्हणाले.