News

पोलिस कर्मचाऱ्याने बेदमपणे बदडले

फिर्याद देण्यास गेलेल्या इसमास गेवराई पोलिस कर्मचाऱ्याने बेदमपणे बदडले
गेवराई तालुक्यातील मादळमोही पोलिस चौकीतील प्रकार ; गंभीर जखमी इसमाची पोलिस अधिक्षकांकडे तक्रार
गेवराई , :- भांडणानंतर पोलिस ठाण्यात फिर्याद घेतली जाते,मात्र फिर्याद देण्यासाठी गेलेल्या एका इसमाची कर्तव्यावरील पोलिस कर्मचाऱ्याने तक्रार तर घेतली नाही,उलट त्यालाच चांगलेच बदडून काढल्याचा प्रकार गेवराई तालुक्यातील मादळमोही चौकीत घडला आहे.यामध्ये सदरील इसम गंभीर जखमी झाला असून कानाला दुखापत झाल्याने ऐकूच येत नसल्याने बीड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.याप्रकरणी गंभीर जखमी इसमाने पोलिस अधिक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.दरम्यान या प्रकरणाची दखल घेत पोलिस अधीक्षक यांनी हे प्रकरण गेवराई पोलिस निरीक्षक यांच्याकडे वर्ग केले आहे.    संदिपान रामभाऊ सानप (वय ४० वर्षे) रा.सावरगाव असे पोलिस कर्मचाऱ्याच्या मारहाणीत जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे.संदिपान सानप यांची चिखली शिवारात जमीन असून ते दि.२५ रोजी ट्रँक्टरच्या सहाय्याने मोघडणी करत होते.यावेळी चिखली येथील संतोष वारे हा त्याच्या पत्नी व मुलासह शेतात येऊन सानप यांना शेत मोघडण्यास मज्जाव केला.यानंतर सानप यांनी वाद नको म्हणून जवळच असलेल्या मादळमोही चौकीत जाऊन घडलेला प्रकार सांगितला. यावेळी चौकीत कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी गुरखुदे यांनी तक्रार घेण्यास नकार दिला.दरम्यान तक्रार का घेत नाही ? म्हणून सानप यांनी जाब विचारल्याचा गुरखुदे यांना राग आला.यानंतर गुरखुदे यांनी संदिपान सानप यांना चौकीतील एका खोलीत नेऊन बेल्ट,काठी व बँटने जबर मारहाण करत शिव्या घालत चौकीबाहेर हाकलून दिले.दरम्यान मारहाणीत जखमी झालेल्या सानप यांच्या कानाला गंभीर दुखापत झाल्याने ऐकण्यास येत नाही.तसेच हात,पायाला देखील गंभीर मार लागला असून सानप यांचँयावर बीड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.याबाबत सानप यांनी पोलिस अधिक्षक यांच्याकडे लेखी तक्रार करुन पोलिस कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.दरम्यान पोलिस अधिक्षकांनी हे प्रकरण चौकशीसाठी गेवराई पोलिस निरीक्षक यांच्याकडे वर्ग केले आहे. 
                   – चौकट –
चौकशी करून कारवाई करणार   याप्रकरणी गेवराईचे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम चोबे यांना विचारले असता ते म्हणाले की,सदरील प्रकार गंभीर आहे.या प्रकरणी चौकशी करण्यात येईल,यामध्ये जर सदरील पोलिस कर्मचारी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल.