महाराष्ट्र

राज्यात ‘या’ ठिकाणी येत्या दोन दिवसांत गारपीट, मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता

हवामान विभागाने दिला अंदाज

4 May :- दक्षिण मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागावर चक्रीय चक्रवात आता उत्तर अंतर्गत कर्नाटक व लगतच्या भागाकडे सरकला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

सातत्याने होत असलेल्या पावसामुळे ऐन उन्हाळ्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील कमाल व किमान तापमानात घट झाली असल्याचे दिसून येत आहे. राज्यात सोमवारी सर्वाधिक कमाल तापमान जळगाव येथे ४१.२ अंश सेल्सिअस तर सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १६.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.गेल्या २४ तासात राज्यात बुलढाणा ३०, चंद्रपूर १२, महाबळेश्वर २०, पुणे २७, पाषाण २२.५, पणजी ११, मार्मागोवा व परभणी ६, जालना ३, औरंगाबाद १.६ मिमी पावसाची नोंद झाली होती. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत महाबळेश्वर, औरंगाबाद, नागपूर, गोंदिया, पुणे येथे हलका पाऊस झाला.

राज्यात होत असलेल्या पावसामुळे विदर्भाच्या बर्‍याच भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मराठवाडा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल व किमान तापमानात किंचित घट झाली आहे.

राज्यात ४ मे रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ५ मे रोजी राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून ६ व ७ मे रोजी संपूर्ण राज्यात काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना, सोसाटयाचा वारा वाहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.