बीड

चार खून, जिल्हा हादरला!

तीन घटनांत चार खून, नांदेड जिल्हा हादरला!

एकीकडे कोरोनाची भयंकर साथ चालू असताना दुसरीकडे नांदेड जिल्ह्यात काल रात्री आणि आज सकाळी वेगवेगळ्या घटनांत झालेल्या ४ खुनामुळे संपूर्ण जिल्हा हादरुन गेला. हस्सापूर शिवारात एका युवकाचा पोटात खंजीरने वार करुन खून करण्यात आला. तर बिलोली तालुक्यातील अटकळी येथे रागाच्या भरात मुलाने बापाचा काटा काढला, तर मुखेड तालुक्यातील मंडलापूर येथे पतीने आपली पत्नी आणि मुलाचा धारदार चाकूने गळा चिरुन हत्या केली.

हस्सापूर शिवारातील दर्गाजवळ २६ मे च्या रात्री महंमद वाजीद महंमद गौस (२९ रा.खडकपूरा) याच्यावर तेहरानगर भागातील गुडू आणि शाहरुख या दोघांनी प्राणघातक हल्ला केला. हल्लेखोरांनी आपल्याजवळील खंजीरने महंमद वाजीदच्या पोटात अनेक वार केले. त्यामुळे तो जागीच गतप्राण झाला. घटनेचे वृत समजताच सहायक पोलीस निरीक्षक व्ही. ए. पल्लेवाड व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले व त्यांनी पंचनामा करुन खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी आणि मयत तरुणात अनेक दिवसापासून वाद सुरु होते त्यातूनच हा खुन झाल्याचे प्राथमिक अहवालातून कळते.

दुसऱ्या एका घटनेत अटकळी (ता. बिलोली) येथील मारोती पिराजी रघुपती (४०) याला नेहमी दारु पिण्याची सवय होती. २६ मेच्या रात्री घरात येवून त्याने धिंगाणा घातला व वाद उखरुन काढला. आरोपीने आपला मुलगा भुमाजी मारोती रघुपती यास शिवीगाळही केली. रागाच्या भरात मुलगा भुमाजी याने मारोती रघुपती यांना चाकुने भोसकले. त्यानंतर त्यांचा गळा चिरला. यात मारोती रघुपती मृत्यूमुखी पडला. घरगुती वादाने घडलेल्या या घटनेने या परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर मयताची पत्नी पारुबाई रघुपती हिने दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी भुमाजी रघुपती याच्याविरुध्द भादंविच्या ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून भुमाजी रघुपती यास अटक झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक सोमनाथ शिंदे यांनी दिली. आज बिलोली न्यायालयासमोर त्याला उभे केले असता भुमाजी रघुपती यास पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

तिसऱ्या घटनेत देगलूर तालुक्यातील येडूर येथील तानाजी भुताळे (३०) याचा विवाह मंडलापूर येथील वैशाली हिच्या समवेत झाला होता. तानाजीला दारुचे व्यसन असल्याने वैशाली कंटाळून आपल्या माहेरी छोट्या मुलासह मंडलापूर येथे आली होती. आपली पत्नी गावाकडे येत नाही याचा राग अनावर झाल्याने दारुच्या नशेत २७ मे रोजी सकाळी येडूर येथून सासरवाडी मंडलापूर (ता.मुखेड) येथे आला. त्याने आपल्या पत्नीला गावाकडे चल म्हणून तगादा लावला. यावरुन त्यांच्यात वाद झाला. या वादातच आपली पत्नी वैशाली (२५) व मुलगा आदेश (१) या दोघांचा गळा चिरुन खून केला. त्यानंतर तो गावातून पळून जात असताना ग्रामस्थांनी त्याला पकडून झाडाला बांधले. पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब मगर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हे वृत्त लिहिपर्यंत चालू होती. पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर व त्यांच्या सहकाऱ्यांनी संबंधित पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांना सूचना करुन आरोपीस कडक शासन करण्याच्या सूचना करुन घटनेचा तपास योग्य दिशेने करण्याचे आदेश दिले आहेत.