महाराष्ट्र

राज्य सरकारचा नवा आदेश; राज्यात 15 मे पर्यंत लॉकडाउन

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढले आदेश

29 April :- राज्यात दरदिवशी कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला आहे. राज्य सरकारने सध्या राज्यात सुरू असलेला लॉकडाउन १५ मे पर्यंत वाढवला आहे. राज्य सरकारने यासंदर्भात आदेश काढला असून त्यानुसार आत्ता राज्यात लागू असलेले निर्बंध १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असणार आहेत.राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी यासंदर्भातील आदेश काढले आहेत.

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बोलताना यासंदर्भातले संकेत दिले होते. राज्यात १५ दिवस किंवा त्याहून जास्त काळासाठी लॉकडाउन वाढवला जाऊ शकतो, अशी शक्यता त्यांनी वर्तवली होती. त्यानुसार आज राज्य सरकारने स्वतंत्र आदेश काढून राज्यात सध्या लागू असलेले निर्बंध १५ मे पर्यंत कायम राहतील असं जाहीर केलं आहे. राज्यात १४ एप्रिलपासून सरकारने करोनाबाबतचे निर्बंध लागू केले होते. त्यामध्ये २२ एप्रिलपासून लॉकडाउनच्या कठोर निर्बंधांचा समावेश करण्यात आला होता.

आधीच्या आदेशांनुसार हे निर्बंध १४ एप्रिल रोजी संध्याकाळी ८ वाजेपासून १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंतच लागू असणार होते. मात्र, राज्यातील रुग्णवाढीचा दर आणि मृतांची वाढतच जाणारी संख्या पाहाता लॉकडाउनमध्ये वाढ करण्याची भूमिका अनेकांनी मांडली होती. राज्य सरकारमधील काही मंत्र्यांनी देखील त्यासंदर्भात स्पष्ट मत मांडलं होतं. राजेश टोपे यांनी देखील बोलताना लॉकडाउन वाढवावाच लागेल अशीच राज्यातली परिस्थिती आहे, असं म्हटलं होतं. त्यानुसार आता राज्य सरकारने त्यासंदर्भात आदेश काढले आहेत.