विरारमधील रुग्णालयातील आगीत 14 जणांचा मृत्यू
विरार रुग्णालयातील घटना ही अतिशय दुर्दैवी: आरोग्यमंत्री राजेश टोपे
23 April :- नाशिकमध्ये ऑक्सिजन यंत्रणेतील बिघाडामुळे 24 कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला होता. ही घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना मुंबईतील विरारमध्ये घडली आहे. विरारमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात भीषण आग लागली असून यामध्ये तब्बल 14 रुग्णांचा मृत्यू झालाय. विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ही आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळं ही आग लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात एकूण 17 रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी 14 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला आता यश आलं आहे. मध्यरात्री साडेतीन वाजता विरार पश्चिममध्ये असलेल्या विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागली. हे कोविड रुग्णालय असून या रुग्णालयात एकूण 39 रुग्ण उपचार घेत होते.
झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!
प्राथमिक माहितीनुसार, अतिदक्षता विभागातील एसी कॉम्प्रेसरला आग लागली. या आगीत एकूण 14 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. आग लागल्यानंतर इतर रुग्णांना वसई-विरारमधील इतर रुग्णालयांमध्ये स्थलांतरित करण्यात आलं आहे. आग लागल्याची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर काही वेळातच आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. राज्यातील रुग्णालयांमध्ये आग लागण्याच्या घटना सुरूच असून आता विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयाला भीषण आग लागली आहे. या आगीत 14 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
ही घटना अतिशय दुर्दैवी आहे अशी भावना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे या घटनेवर बोलताना म्हणाले की, “प्राथमिक स्तरावर पाहता ही दुर्घटना असल्याचं समजतंय. अचानकपणे एसीचा स्फोट झाल्याने केवळ दोन ते तीन मिनीटात सर्वत्र धुर पसरला. त्यामुळे रुग्णांना वाचवायला वेळ कमी मिळाला. दरवाज्याच्या जवळील चार रुग्णांना वाचवण्यात यश आलं आहे.” हा स्फोट का झाला. कसा झाला याची चौकशी करण्यात येईल असं सांगत राजेश टोपे म्हणाले की, “या घटनेवर शासनस्तरावर योग्य ती मदत केली जाईल. सध्या कोरोनाची परिस्थिती असल्याने दवाखान्यांना हातही लावता येत नाहीत. पण फायर ऑडिट, ऑक्सिजन ऑडिटचे आदेश सर्व रुग्णालयांना देण्यात आले आहेत.”