धनंजय मुंडेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
जिल्ह्यात 6 ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्लान्ट उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करा
21 April :- बीड जिल्ह्यासह राज्यभरात वाढलेल्या कोरोना रुग्णासंख्येमुळे सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे, यावर उपाय म्हणून रुग्णालयातच हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभा करावा, यासाठी बीड, परळी, आष्टी, गेवराई, माजलगाव, केज या ठिकाणच्या रुग्णालय परिसरात जागांची पाहणी व इतर चाचपणी करून तातडीने प्रस्ताव सादर करावेत असे निर्देश बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. दोन दिवसांपूर्वी (दि.19) मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अजितदादांनी याबाबतचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देत असल्याचा निर्वाळा केला होता.
झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!
जिल्ह्यातील बीड , आष्टी, माजलगाव, गेवराई आणि केज येथील रुग्णालयातील ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन त्याठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभा करण्यासाठी आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे, बीडचे आ. संदीप क्षीरसागर,माजलगावचे आ. प्रकाश सोळंके, मा.आ. अमरसिंह पंडित, पृथ्वीराज साठे रा.कॉ.चे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे आदींनी ना. मुंडेंकडे मागणी केली होती. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात परळी औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्पातील ऑक्सिजन प्लांट धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून शिफ्ट करण्याचे काम सुरू आहे.
त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांनी, प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प स्थापन करण्यात यावेत, यासाठी आवशयक खरेदी व अन्य प्रक्रिया तातडीने राबवावी, असे निर्देश देत, याचे अधिकार संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार वरील सहा तालुक्यात ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्याबाबतची चाचपणी करून त्याबाबतचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असे निर्देश धनंजय मुंडे यांनी दिल्यानंतर जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे.