राजकारण

अटक मटक चवळी चटक वाटलं की काय?

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी उडवली रुपाली चाकणकर यांची खिल्ली

19 April :- राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. पार्ले पोलीस स्टेशनला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जाऊन पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप राष्ट्रवादी नेत्या रुपाली चाकणकर यांनी करत फडणवीसांना अटक करा अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली. त्यावरून भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांची खिल्ली उडवली आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करून म्हटलंय की, उठले की निघाले आरोप करायला, आता काय तर म्हणे देवेंद्र फडणवीसांना अटक करा.अटक मटक चवळी चटक वाटलं की काय? रेमडेसिवीर राज्य सरकारलाचं देणार होते संबंधीत मंत्र्यांशी CSसाहेबांशी बोलणं झालेलं..माहिती तर घ्यायची. आधी सरकार म्हणतं सहकार्य करा आम्ही करत आहोत व करणारचं पण या बावळटांना आवरा रे अशा शब्दात अप्रत्यक्षपणे चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!

एकाबाजूला राजकारण करू नका हे विरोधी पक्षाला सांगायचं व दुसरीकडे आपलं अपयश लपवण्यासाठी कांगावा करायचा. रोज माणसं तडफडून मरताहेत. रेमडेसिवीर अभावी देवेंद्र फडणवीस यांनी ब्रूक फार्मा कंपनीला विनंती करत नियमाने FDA ची परवानगी घेत आणण्याचा प्रयत्न केला तर कंपनीच्या माणसांनाच पोलीस उचलतात. ब्रूक फार्मा रेमडेसिवीरची मदत महाराष्ट्राला करणार होते. त्या कंपनीच्या लोकांना मंत्र्याचा OSD फोनकरून दम देतो? मंत्र्याच्या OSD ची काय एवढी हिंमत की तो कंपनीच्या लोकांना फोनवरून धमकी देईल की सरकारला यातूनही आधी वसूली करायची होती याबाबत चकार शब्द ही सत्ताधाऱ्यांकडून आला नाही असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा असल्याच्या संशयावरून पोलिसांनी ब्रूक फार्माच्या मालकाला चौकशीसाठी बोलावलं होतं. परंतु त्यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस स्टेशनवर जाऊन सरकारी कामात अडथळा आणला त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सांगितले होते.