पकडायला गेले रानडुक्कर, निघाला बिबट्या शिकाऱ्यांची पाचावर धारण
कडा- आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथील ऊसाच्या शेतात शिकाऱ्यांनी रानडुक्करांना पकडायला जाळे लावले परंतु तेथे रानडुक्कराऐवजी बिबट्या अडकल्याने शिकाऱ्यांचीच शिकार होता – होता वाचल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. कोवीड १९ बफर झोन असलेल्या गांवात हा प्रकार घडला आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, सध्या सर्वत्र लाॅकडाऊन आहे. आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे बाहेरुन आलेल्या पाहुण्यांमुळे कोरोना रुग्ण सापडले. त्यामुळे हा परिसर कॅंटोन्मेंट व बफर झोन मध्ये आहे. परंतु शेतात राहणारे शेतकरी मात्र कामात आहेत. बुधवारी दुपारच्या सुमारास रानडुक्करांची शिकार करण्यासाठी पंधरा ते वीस जण सोबत शिकारी कुत्रे घेऊन आले. लिंबोडी येथील अशोक तुकाराम आंधळे यांच्या ऊसाच्या शेताच्या एका बाजुने जाळे लावले व दुसऱ्या बाजूने कुत्र्याला आत सोडून त्यांच्या मागे गेले. परंतु त्या ऊसात रानडुक्करांऐवजी चक्क बिबट्याचा निघाला. त्याने काही कुत्र्यावर देखील हल्ला केला. लावलेल्या जाळ्याजवळ रानडुक्कराऐवजी बिबट्या आल्याचे पाहुण शिकाऱ्यांची बोबडीच वळाली आणि काही मिनिटांत सर्व शिकाऱ्यांनी तेथून धुम ठोकली. ही वार्ता लिंबोडी परिसरात पसरली त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी येऊन फटाके वाजवून बिबट्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण तो बाहेर आलाच नाही.त्यामुळे या परिसरातील शेतकरी घाबरले आहेत.
आष्टी तालुक्यातील शिरापुर, कडा, शेरी या परिसरात बिबट्याचा अनेक महिन्यांपासून वावर आहे. तो परिसरातील शिकारीसाठी भटकंती करीत असावा. लिंबोडी परिसरात रानडुक्करं भरपूर आहेत त्यामुळे शिकार करण्याच्या शोधात बिबट्या त्या परिसरात गेला असण्याचा अंदाज आहे. परंतु रानडुक्करांच्या शिकारीच्या नादात बिबट्या कडून त्या शिकाऱ्यांचीच शिकार झाली नाही हे बरं झाले.