News

कोरोना लढाईत आम्ही आपल्यासोबत, राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन

नवी दिल्ली : कोरोनाचं संकट गहिरं होत असताना, इकडे महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. एकीकडे महाविकास आघाडीची नियमित आढावा बैठक होत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरु चर्चा केली. “कोरोना लढाईमध्ये आम्ही आपल्यासोबत आहे. राज्यात कोरोना कमी करण्यासाठी सर्व प्रयत्न करु”, असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांच्या या संवादामुळे महाविकास आघाडीत काहीसं तणावाचं बनलेलं वातावरण निवळण्याची चिन्हं आहेत.

कारण राहुल गांधी यांनी कालच केलेल्या विधानाने महाविकास आघाडीतील संभ्रम आणखी वाढला होता. “आम्ही महाराष्ट्रात सरकारला पाठिंबा दिला आहे पण आम्ही मुख्य निर्णयकर्ते नाही”, असं राहुल गांधी म्हणाले होते.

दरम्यान, कोरोना संकटात भाजप नेते महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करत आहेत, तर आधी गुजरातमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. त्यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आम्ही महाराष्ट्रात सरकारला पाठिंबा दिला आहे पण आम्ही मुख्य निर्णयकर्ते नाही, असं म्हटल्याने अस्थिरतेबाबतच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आता राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधल्याने महाविकास आघाडीतील कथित तणाव दूर होण्याची चिन्हं आहेत.

राहुल गांधी काल काय म्हणाले होते?

“महाराष्ट्र सरकारला आमचा पाठिंबा आहे . मात्र, आम्ही मुख्य निर्णयकर्ते नाहीत. आम्ही पंजाब, छत्तीसगड, राजस्थान या राज्यांमध्ये मुख्य निर्णयकर्ते आहोत. सरकार चालवणं आणि सरकारला पाठिंबा देणं हा यातला फरक आहे”, असं काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले होते.

बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया

दरम्यान, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी भाजप खासदार नारायण राणे यांनी केली होती. त्यावर काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हल्ला चढवला होता. “माजी मुख्यमंत्री नारायण राणे अस्वस्थ आहेत. भाजपची सत्ता येईल, मंत्रीपद मिळतील, असं काही जणांना वाटतं. तापलेल्या वातावरणात सत्तेची पोळी भाजणारी ही मंडळी आहेत”, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राणेंवर हल्ला चढवला.