महाराष्ट्र

मुकेश अंबानी आले राज्य सरकारच्या मदतीसाठी धावून

१०० मेट्रिक टन प्राणवायू विनाशुल्क पुरवल्या जाणार

17 April :- अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. अशा परिस्थितीत रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी राज्य सरकारच्या मदतीसाठी धावून आले आहेत. रिलायन्सच्या गुजरातमधील जामनगर रिफायनरीमधून राज्य सरकारला १०० मेट्रिक टन प्राणवायू पुरवला जाणार आहे. मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे राज्य सरकारने इतर राज्यांमधून ऑक्सिजन मागवला आहे.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!

रिलायन्सकडून पेट्रोलियम कोक गॅसिफिकेशनसाठी ऑक्सिजनचा वापर केला जातो.त्यामुळे कंपनीकडे उपलब्ध साठ्यापैकी १०० मेट्रिक टन ऑक्सिजन वैद्यकीय वापरायोग्य करून तो महाराष्ट्राला विनाशुल्क पुरवला जाणार असल्याचे रिलायन्समधील एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.

दरम्यान, राज्यात ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहण्यासाठी राज्य सरकारने समन्वय समितीची स्थापना केली आहे. ऑक्सिजन पुरवठ्याबाबत नुकतीच नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. यात ऑक्सिजन उपलब्धता आणि पुरवठा, त्याची वाहतूक करण्यासाठीची आवश्यक साधने यावर चर्चा करण्यात आली.