महाराष्ट्र

खळबळजनक! बेड नाही मिळाला, करोनाबाधित महिलेनं लावला गळफास

आरोग्य व्यवस्थेची परिस्थिती चव्हाट्यावर

17 April :- करोना विषाणूच्या थैमानामुळे दररोज हजारो लोकांना संसर्ग होत असून, आरोग्य व्यवस्थेवर असह्य ताण पडू लागला आहे. राज्यातील महानगरे आणि प्रत्येक जिल्ह्यातील चित्र आता जळपास एकसारखंच दिसू लागलं आहे. करोनामुळे रुग्णांच्या मनात मृत्यूची भीती घर करत असून, नातेवाईकांना बेडसाठी धावपळ करावी लागत आहे. मात्र, तरीही अनेकांना बेड मिळत नसल्याचं दिसत आहे. हे ढळढळीत वास्तव समोर आणणारी खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे. बेड मिळत नसल्यानं एका करोनाबाधित महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!

या घटनेनं पुण्यातील आरोग्य व्यवस्थेची परिस्थिती चव्हाट्यावर आली आहे.करोना संक्रमणानं पुण्यात हातपाय पसरले असून शहरात दररोज ५ हजारांच्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे पुण्यातील रुग्णालयांवर ताण पडत असून, बेडचा तुटवडा जाणवत आहे. ही परिस्थिती दाखवून देणारा ससून रुग्णालयातील व्हिडीओ समोर आले होते. त्यानंतर आता एका करोनाबाधित महिलेच्या आत्महत्येनंतर पुन्हा एकदा विषय ऐरणीवर आला आहे. पुण्यातील वारजे भागातील एका महिलेला करोनाचा संसर्ग झाला होता.
महिला उपचारासाठी शहरातील अनेक रूग्णालयात फिरली. मात्र, तिला कुठेही जागा मिळाली नाही. त्या नैराश्यातून अखेर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. त्या महिलेची सुसाईड नोट सापडली असून, मी आजाराला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचं त्यात म्हटलेलं आहे.

वारजे भागात एक महिलेला करोना झाला होता. तिला खूप त्रास होऊ लागल्याने तिने १२ एप्रिल रोजी पतीसोबत दिवसभर शहरातील अनेक रूग्णालयात जाऊन बेड मिळण्यासाठी प्रयत्न केला. मात्र काही केल्या त्यांना बेड मिळाला नाही. त्याच दरम्यान तिला खूप त्रास होऊ लागला. त्यात या महिलेला दुसरा आजार देखील होता. त्यामुळे ती अस्वस्थ झाली. सोमवारी रात्री जेवण झाल्यावर ती बेडरूममध्ये गेली. पण सकाळी बराच वेळ झाला तरी बाहेर आली नाही. त्यामुळे तिच्या पतीने आत जाऊन पाहिले असता, तिने गळफास घेतल्याचं दिसून आलं. तिला तत्काळ रूग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलं. दरम्यान, पोलिसांनी रूमची पाहणी केली. यावेळी संबधित महिलेनं आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली सुसाईड नोट सापडली असून, मी आजाराला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचं त्यात म्हटलं आहे. आता त्या आधारे तपास सुरू असल्याचे वारजे पोलिसांनी सांगितलं.