राजकारण

उद्धव ठाकरेंनी निर्लज्ज राजकारण थांबवावं- केंद्रीय मंत्री पियुष गोयल

परखड शब्दांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका

17 April :- एकीकडे महाराष्ट्रात आणि देशभरात देखील करोनाचे रुग्ण आणि करोनामुळे होणारे मृत्यू यामध्ये मोठ्या संख्येने वाढू लागले आहेत. त्यामुळे नागरिक चिंताग्रस्त झाले असून त्यात रेमडेसिवीर, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरच्या तुटवड्याची भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून लस तुटवड्यानंतर या गोष्टींच्या तुटवड्यावर आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. त्यात राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर भेदभाव करत असल्याचा आरोप केल्यानंतर थेट केंद्रातून मंत्री पियुष गोयल यांनी परखड शब्दांमध्ये महाराष्ट्र सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!

“उद्धव ठाकरेंनी त्यांचा हा निर्लज्ज राजकारणाचा रोजचा डोस थांबवावा आणि जबाबदारी घ्यावी”, असं ट्वीट पियुष गोयल यांनी केलं आहे. नवाब मलिक यांनी रेमडेसिवीर पुरवठ्यावरून टीका केल्यानंतर पियुष गोयल यांनी चार ट्वीट करत राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. “ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून उद्धव ठाकरेंनी चालवलेल्या क्लृप्त्या पाहून दु:ख झालं. केंद्र सरकार देशात जास्तीत जास्त ऑक्सिजनचं उत्पादन व्हावं यासाठी प्रयत्नशील आहे.

आपण सध्या आपल्या क्षमतेच्या ११० टक्के ऑक्सिजनची निर्मिती करत असून उद्योग क्षेत्राचा ऑक्सिजन देखील वैद्यकीय वापरासाठी उपलब्ध करून दिला जात आहे”, असं पियुष गोयल म्हणाले आहेत. पुढच्याच ट्वीटमध्ये गोयल यांनी राज्याला सर्वाधिक ऑक्सिजन पुरवला जात असल्याचा दावा केला आहे. “आत्तापर्यंत महाराष्ट्राला देशात सर्वाधिक ऑक्सिजन पुरवण्यात आला आहे. केंद्र सरकार सातत्याने राज्य सरकारांच्या संपर्कात असून त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा शक्य तेवढा प्रयत्न करत आहे”, असं गोयल म्हणाले आहेत.