महाराष्ट्र

पडक्या विहिरीत उडी टाकून विवाहितेची 2 चिमुकल्यांसह आत्महत्या

नांदेडमध्येही मायलेकाची आत्महत्या

17 April :- कौटुंबिक कलहाला वैतागून औरंगाबादेत विवाहितेने दोन चिमुकल्यांसह आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पडक्या विहिरीत उडी घेऊन महिलेने लेकरांसह आयुष्य संपवलं. पैठण तालुक्यातील गेवराई तांडा गावात ही घटना घडली. वैशाली थोरात यांनी दोन चिमुकल्यांना सोबत घेऊन आत्महत्या केली. गावाशेजारी असलेल्या पडक्या विहिरीत त्यांनी दोन्ही मुलांसोबत उडी टाकली. आत्महत्येच्या घटनेनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. महिलेच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. महिलेच्या पतीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!

दरम्यान, कोरोनामुळे पतीचं निधन झाल्याचा धक्का बसल्याने पत्नीने मुलासह आत्महत्या केल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात घडल्याचे समोर आले आहे. कोरोना संसर्गानंतर उपचारादरम्यान पतीची प्राणज्योत मालवल्याचं समजताच पत्नीने थेट तलाव गाठला. दोन मुलींना घरी ठेवून तिने धाकट्या मुलासह आयुष्य संपवलं. तेलंगणातून गंदम कुटुंब नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात मजुरीसाठी आलं होतं. बालाजी मंदिराच्या पाठीमागे राहून मजुरी करत ते उदरनिर्वाह करत होते.

दरम्यानच्या काळात 40 वर्षीय पती शंकर गंदम यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांना लोहा येथील कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु मंगळवारी उपचारादरम्यान शंकर यांनी अखेरचा श्वास घेतला. पतीच्या निधनाची बातमी समजताच पद्मा गंदम यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. पतीच्या पश्चात जगण्याची कल्पना असह्य झाल्याने त्यांनीही आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. तीन वर्षांचा मुलगा लल्ली याच्यासह पद्मा यांनी सुनेगाव येथील तलाव गाठलं. दोघी मुलींना घरी ठेवून त्यांनी धाकट्या लेकासह तलावात उडी घेतली.