राजकारण

सरकार बदलणारा अजून जन्माला यायचाय

अजित पवारांचा फडणवीसांना टोला

15 April :- पंढरपूर पोटनिवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलेल्या टीकेला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज्यातील आघाडी सरकार पाडणारा अजून जन्माला यायचा आहे. सरकार पाडणे कोणा येरा गबाळ्याचे काम नाही, अशा शब्दात आज अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पहिल्यांदाच थेट निशाणा साधला. राजकारणात कोणी कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो म्हणून बोलायला सुरुवात केलेल्या अजित पवार यांनी नंतर राज्यातील आघाडी सरकार पाडणे म्हणजे काय खेळ वाटतो काय? हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिले. आज सायंकाळी पंढरपूर येथील शिवाजी चौकात राष्ट्रवादी उमेदवार भागीरथ भालके यांच्या प्रचाराची सभा घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. आजवर अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्यावर इतक्या थेट शब्दात कधी बोलले नव्हते. मात्र आजची राष्ट्रवादीची सभा ही फडणवीसांच्या सभेला उत्तर देणारी सभा ठरली.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!

आजच्या सभेत शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील , प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या सर्वांच्या भाषणाचा रोख हा फडणवीस यांच्या वक्तव्यावर होता. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या केलेल्या नकलीवर देखील अजित पवार भडकले. आपण कोणाच्या भानगडीत नसतो आणि आपला नाद कोणी करायचा नाही आणि केला तर… असे म्हणत गर्भित इशाराही दिला. फडणवीस यांनी शरद पवार यांच्या पावसात भिजण्यावर केलेल्या वक्तव्याचाही अजित पवार यांनी समाचार घेत तुम्ही कुठे, साहेब कोठे…. म्हणत फडणवीस यांना जागा दाखवून देण्याचा प्रयत्न केला. अजित पवार यांनी आज चंद्रकांत पाटील यांचा उल्लेखही ‘चंपा’ असा करत ते उद्या येथे येऊन काहीही सांगतील पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नका असं सांगत सभेची सांगता केली.

मंगळवेढ्यात 35 गावाच्या पाण्याचा प्रश्न केंद्राचे पैसे आणून सोडवतो या फडणवीसांचे वक्तव्यही राष्ट्रवादीला चांगलेच झोंबले असून ते पाणी द्यायला आम्ही समर्थ आहोत, असे उत्तर जयंत पाटील यांनी दिले. केंद्र जे पैसे देते ते राज्याकडून मिळणाऱ्या कराचे असते आणि ते पैसे आमच्या हक्काचा असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. सध्या एकजण आमदार देता का आमदार म्हणत सर्वत्र फिरत असून हे सरकार 170 आमदारांच्या पाठिंब्यावर उभे असल्याने या सरकारला काहीही होणार नसल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. सरकार पाच वर्षे टिकणार असून ते पाच वर्षे विरोधी पक्षनेते म्हणून राहणार का? असा सवाल करत फडणवीस यांना लक्ष्य केले. शिवसेनेचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शेरोशायरी करत सभेत जोरदार टाळ्या घेतल्या. सुरुवातीला प्यार का वादा फिफ्टी फिफ्टी म्हणत मातोश्रीवर उद्धव साहेबांना भुलवयाला आले होते. पण चाणाक्ष पवार साहेबानी परिस्थिती हेरत अमर अकबर अँथनी म्हणत तिघांना एकत्र करत सरकार केल्याचा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला. सरकार पडणार असे आधी नारायण राणे यांना स्वप्न पडायची आता तीच गत फडणवीस यांची झाल्याचा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला. फडणवीस यांच्याचमुळे आयुष्यात पहिल्यांदा राष्ट्रवादीला मत मागायची संधी मिळाल्याचा टोलाही गुलाबराव पाटील यांनी लगावला.