महाराष्ट्र

लॉकडाऊनविरोधात उदयनराजे भोसलेंच हटके आंदोलन

हातात कटोरा घेऊन बसले फुटपाथवर

10 April :- राज्यात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध आणि वीकेंडला लॉकडाऊन लावण्यात आला आहे. याविरोधात भाजप आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी या लॉकडाऊनविरोधात हटके आंदोलन केले आहे. तसेच, त्यांनी यावेळी राज्य सरकारला लॉकडाऊनचा निर्णय मागे घेण्याचे इशाराही दिला.भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी साताऱ्यातील पोवईनाक्यावर लॉकडाऊनविरोधात हटके आंदोलन केले.

यावेळी ते हातात कटोरा घेऊन ते फुटपाथवर बसले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकारला कडक शब्दात इशारा दिला. ते म्हणाले, ‘राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय मागे न घेतल्यास लोकं आणि मी ऐकणार नाही. उद्यापासून लॉकडाऊन उठला पाहिजे. तसे न झाल्यास, मारामारी किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. लोक पोलिसांनाही मारायला मागे-पुढे पाहणार नाहीत. त्यासाठी सरकार जबाबदार असेल, असे उदयनराजे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, ‘सरकारने लोकांची आर्थिक अवस्था लक्षात घेतली पाहिजे. लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल. सरकारमधील कोणते तज्ज्ञ लॉकडाऊनचा निर्णय घेतात. त्यांना पाहिल्यास ते कुठल्याही दृष्टीने तज्ज्ञ वाटत नाहीत. जोपर्यंत वैद्यकीय समुदाय किंवा शास्त्रज्ञ लॉकडाऊनची गरज आहेच, असा अहवाल देत नाहीत, तोपर्यंत आम्ही लॉकडाऊन लागू देणार नाही’, असा इशारा उदयनराजे भोसले यांनी यावेळी दिला.