बीड

बीडच्या दाम्पत्याचा अमेरिकेत मृत्यू

आत्महत्या की खून अद्याप प्रश्नचिन्ह

9 APRIL :- नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत राहत असलेल्या अंबाजोगाईमधल्या तरुण दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे या दाम्पत्याची चार वर्षाची मुलगी सुखरुप आहे. त्यामुळे ही आत्महत्या आहे की खून या संदर्भात कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. बालाजी भारत रुद्रवार (वय 32 वर्ष) आणि आरती बालाजी रुद्रवार (वय 30 वर्ष) अशी या मृत पती-पत्नीची नावं आहेत. बालाजी हा अंबाजोगाईतील प्रसिद्ध व्यापारी भारत रुद्रवार यांचा मुलगा होता. आयटी कंपनीतील नोकरीच्या निमित्ताने बालाजी सहा वर्षापूर्वी अमेरिकेत न्यू जर्सीमधील अर्लिंग्टन भागात कुटुंबासह स्थायिक झाला होता.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!

दरम्यान बुधवारी (7 एप्रिल) सायंकाळी त्यांची चार वर्षीय मुलगी विहा गॅलरीत बराच वेळ एकटीच रडत थांबल्याचे दिसून आल्याने शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना कळवले.त्यानंतर पोलिसांनी दाखल झाल्यावर त्यांना घरात बालाजी आणि आरती यांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आले.

भारतीय वेळेनुसार गुरुवारी (8 एप्रिल) सकाळी नऊ वाजता स्थानिक पोलिसांनी या घटनेबाबत भारत रुद्रवार यांना फोनवरुन माहिती दिली. या घटनेमुळे रुद्रवार कुटुंबीय प्रचंड मानसिक धक्क्यात आहेत.बालाजीचे कुटुंबीय अंबाजोगाईत आहेत. रुद्रवार दाम्पत्याच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. शवविच्छेदनानंतरच या दाम्पत्याने आत्महत्या केली किंवा त्यांचा खून झाला हे स्पष्ट होऊ शकणार आहे.