भारत

वाघाच्या हल्ल्यात तब्बल 9 लोकांचा मृत्यू

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!

6 April :- वाघाच्या हल्ल्यात मोहफुल वेचण्यासाठी गेलेल्या काका-पुतण्याचा मृत्यू झाल्याची अतिशय दुर्दैवी घटना चंद्रपूर जिल्ह्यात आज उघडकीस आली आहे. सिंदेवाही तालुक्यातील पवनपार गावालगतच्या जंगलात आज सकाळी मोहफुल वेचण्यासाठी गावातील लोकं गेले होते आणि त्याच वेळी वाघाने कमलाकर उंदीरवाडे आणि धुर्वास उंदिरवाडे यांना हल्ला करून ठार केले. एकाच वेळी वाघाने दोन लोकांना ठार केल्याची ही घटना अतिशय दुर्मिळ असून या मुळे परिसरात मोठी दहशत पसरली आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 2 महिन्यात वाघाच्या हल्ल्यात तब्बल 9 लोकांचा मृत्यू झालाय आणि त्यामुळे पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष वाढल्याचं चित्र आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात मागच्या वर्षी म्हणजे 2020 साली जवळपास 30 लोकांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. वाघाच्या हल्ल्यातील मृत्यूंची ही आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. मात्र गेल्या 2 महिन्यात ज्या प्रमाणात वाघांचे हल्ले वाढतांना दिसत आहेत त्यावरून यावर्षी हा आकडा देखील मागे टाकला जाईल की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. अवघ्या दोन महिन्यात 9 जणांचे वाघाच्या हल्ल्यात बळी गेल्याने वनविभाग आणि जंगलाशेजारी राहणाऱ्या गावातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय.

चंद्रपूर जिल्ह्यात जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत शेतीची कामं संपतात आणि त्यानंतर ग्रामस्थ लाकूड-फाटा, बिडीपत्ता, गवत, मोहफूल आणि टेम्भरं गोळा करण्यासाठी जंगलात शिरतात. त्यामुळे त्यांचा वन्यप्राण्यांसोबत सामना होतो आणि अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. गेल्या वर्षी आलेल्या कोरोनामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक कामगार जे शेतीचा हंगाम संपल्यावर जिल्ह्याबाहेर किंवा राज्याबाहेर मजुरी साठी जातात ते जिल्ह्यात परत आले आहेत. कोरोनामुळे यावर्षी देखील त्यांच्या हाताला काम नाही. त्यामुळे शेतीचा हंगाम संपल्यावर म्हणजे अंदाजे फेब्रुवारीपासून हे लोकं जंगलात शिरायला सुरुवात झाली आहे आणि याच वेळी वाघाच्या या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे.