महाराष्ट्र

बच्चू कडू यांनी लगावली कानशीलात

पालकमंत्र्यांच्या रूद्रावतारासमोर सर्वच स्तब्ध

6 April :- चुकी झाल्यानंतर परिणामांची तमा न बाळगता थेट भिडणारा आणि सर्व सामन्यांना न्याय मिळवूं देणारा राजकारणी म्हणून राज्यभरात बच्चू कडूंची ओळख निर्माण झाली आहे. अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू काल सोमवारी जिल्ह्याच्या आढावा बैठकीसाठी अकोल्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक आटोपल्यानंतर बच्चू कडू जिल्हा रूग्णालयात तेथील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी गेले. जिल्हा रूग्णालयात कोविड रूग्णांना निकृष्ट जेवण मिळत असल्याचे व्हिडीओ दोन दिवसांपूर्वी ‘व्हायरल’ झाले होते. त्यामुळे पालकमंत्र्यांनी थेट रूग्णालयातील मेसमध्ये जात त्याची तपासणी केली.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!

रूग्णालयातील मेसची जबाबदारी साहेबराव कुळमेथे या कंत्राटदाराकडे आहे. तर याच मेसमध्ये सुनिल मोरे हा कंत्राटी स्वयंपाकी आहे. यावेळी बच्चू कडू यांनी दररोज तूर आणि मूगदाळ किती लागते असा प्रश्न मेसचे प्रमुख कुळमेथे यांना विचारल्यावर त्यांनी 23 किलो असं उत्तर दिलं. हाच प्रश्न नंतर पालकमंत्र्यांनी जेवण बनवणारे स्वयंपाकी सुनिल मोरे यांना विचारल्यावर त्यांनी आठ ते दहा किलो असं उत्तर दिलं. यानंतर डाळींच्या एका दिवशी 12-13 किलोचा अपहार होत असल्याचं कडू यांच्या लक्षात आल्यानं त्यांचा पारा चढला अन् त्यांनी थेट स्वयंपाकी सुनिल मोरे याच्या कानशीलात लगावली.

पालकमंत्र्यांच्या या रूद्रावतारानं मोरेसह उपस्थित सर्वच स्तब्ध होऊन गेलेत. जिल्हा रूग्णालयात कोविड रुग्णांसाठी आलेल्या धान्याची गेल्या आठ महिन्यांपासून नोंदच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. काल पालकमंत्री मेसमध्ये गेल्यावर त्यांना आणखी एक बाब लक्षात आली. येथील नोंदवहीमध्ये महिनाभराच्या धान्याची मागणी करण्यात आली. मात्र, संबंधित पुरवठादाराकडून फक्त आठ दिवसाचेच धान्य पुरविण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणाची चौकशी कडू यांनी अकोल्याचे उपविभागीय अधिकारी निलेश अपार यांच्याकडे सोपविली आहे. या प्रकरणात निलंबनाची कारवाई प्रस्तावित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जिल्हा रूग्णालयातील मेसमधील या अपहारामागे मेस प्रमुख साहेबराव कुळमेथेच जबाबदार आहे. मात्र, रूग्णालयातील काही वरिष्ठांचा त्याच्यामागे वरदहस्त असल्याने हे वरिष्ठही पालकमंत्र्यांना शोधावे लागणार आहेत.