News

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांची तातडीची बैठक

मुंबई – राज्यात कोरोनाचं संकट वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांची बैठक बोलावली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मंगळवारच्या विधानानंतर राज्यात हालचाली वाढल्या आहेत. महाराष्ट्रात काँग्रेसचा सरकारला पाठिंबा आहे पण काँग्रेस डिसिजन मेकर नाही त्यामुळे राज्यातील काँग्रेसचं सरकारमध्ये अस्तित्व नसल्याचं चित्र दिसून येत आहे.

मंगळवारी राज्यात झालेल्या घडामोडीनंतर तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ही बैठक बोलावली आहे. वर्षा बंगल्यावर ही बैठक होणार आहे. महाराष्ट्रातील ठाकरे सरकार स्थिर आहे असा दावा शिवसेना नेते करत असले तरी सरकारमध्ये बिघाडी असल्याचं राज्यातील घडामोडींवरुन दिसते. शरद पवारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत २ तास चर्चा केली. महाराष्ट्र सरकारवर अस्थिरतेचे सावट असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

बुधवारच्या सामना संपादकीयमध्ये सांगितलं आहे की, शरद पवार आणि संजय राऊत यांनी राज्यपालांची भेट घेऊन कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. शरद पवारांनी अनेकदा मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. या बैठका नियमित स्वरुपात सुरु असतात. भाजपाने महाराष्ट्रऐवजी गुजरातमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी करावी, उद्धव ठाकरे सरकार ११ दिवस चालणार नाही असं म्हणाले आज जवळपास ६ महिने ठाकरे सरकारला पूर्ण झालेत असा टोला त्यांनी भाजपाला लगावला.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकार मजबूत असल्याची ग्वाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेने दिली तर हे सरकार अंतर्विरोधाने पडेल, असे भाकीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वर्तविले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात काँग्रेसला निर्णयाचा अधिकार नसल्याची खंत व्यक्त केली, पण सरकारमधून बाहेर पडणार नसल्याचे स्पष्ट केले.

राज्यातील सरकार मजबूत आहे. तिन्ही पक्ष एकत्र आहेत. कोरोनाच्या संकटातून राज्याला बाहेर काढण्यासाठी आम्ही सर्व ताकद पणाला लावली आहे. ठाकरे यांच्याबरोबरच्या चर्चेत राजकारण हा विषय नव्हता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी व इतर गप्पा झाल्या. मी राज्यात मुख्यमंत्री म्हणून परतणार, या बातम्या पोरकट आहेत. – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी

आम्ही भाजपच्या आमदारांना मुंबईत अजिबात बोलावलेले नाही. सरकार बनवण्याची आम्हाला घाई नाही. हे सरकार अंतर्विरोधाने पडेल. सध्याच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व सक्षम नाही. त्यांनीच अधिक समर्थपणे परिस्थिती हाताळावी आणि त्यांच्या दोन मित्र पक्षांनी त्यांना फटाके लावण्याऐवजी मदत करावी. – देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते