महाराष्ट्र

‘या’ ठिकाणी बिबट्याचे दर्शन; शहरात उडाली खळबळ

बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू

31 March :- सांगली शहरातील राजवाडा चौक परिसरात आज सकाळी बिबट्याचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली आहे. सकाळी सव्वासातच्या सुमारास एका चहावाल्यासह काही नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले. दरम्यान बिबट्या अद्यापही रॉकेल लाईन परिसरातील एका पडक्या घरात लपला असून वनविभागाकडून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!

सांगली शहरात बिबट्या घुसल्याने खळबळ उडाली आहे. राजवाडा चौक याठिकाणी हा बिबट्या दबा धरून बसला असून त्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापुरहून या बिबट्याला पकडण्यासाठी बेशुद्ध करणाऱ्या बंदुकीसह विशेष पथक दाखल झाले आहे.
सकाळपासूनच पोलिसांनी राजवाडा चौक ते पटेल चौकाकडे जाणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद केले होते.

सकाळी साडेनऊच्या सुमारास वनविभागाच्या पथकाने त्या पडक्या घराजवळ जाळी बांधली. तर पडक्या घराच्या दुसर्‍या बाजूकडूनही वनविभागाने जाळी लावली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी कोल्हापूरहून बचाव पथकाला पाचारण करण्यात आले आहे. पडक्या घरात त्याचा शोध घेऊन त्याला बेशुद्ध करून पकडण्यात येणार असल्याचे ढाणके यांनी सांगितले. शिवाय त्याच्या पायाच्या ठस्यावरून तो तीन वर्षांचा असावा, असा अंदाजही वन अधिकारी यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान सकाळी आठ वाजल्यापासून बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू आहेत.