News

२ लाख कोटींच्या मदतीचा फडणवीसांचा दावा फसवा: पृथ्वीराज चव्हाण

कराड: ‘केंद्र सरकारनं महाराष्ट्राला २ लाख ७० हजार कोटी रुपये दिल्याचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा दावा फसवा आहे. केंद्र सरकारचे आर्थिक पॅकेज हे कर्जाधारित असून त्यात अनेक अटी व शर्ती आहेत. त्यामुळं फडणवीसांनी कर्ज किती आणि रोख रक्कम किती याची स्वतंत्र आकडेवारी द्यावी,’ असं आव्हान राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं आहे.

मोदी सरकारनं महाराष्ट्राला कशी मदत केली याची आकडेवारी काल फडणवीसांनी पत्रकार परिषदेत दिली होती. महाविकास आघाडीचे नेते फडणवीसांनी दिलेल्या आकडेवारीवर प्रश्न उपस्थित करू लागले आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी सविस्तर पत्रक प्रसिद्ध करून फडणवीसांच्या आकडेवारीतील फोलपणा दाखवून दिला आहे. ‘केंद्र सरकारच्या २० लाख कोटींच्या पॅकेजमध्ये फक्त २ लाख कोटी रुपये हे रोख रकमेचे आहेत. उर्वरीत पॅकेज हे कर्जाच्या स्वरूपातील आहे. हे पाहता महाराष्ट्राच्या वाट्याला फारतर २० हजार कोटी रुपये येऊ शकतात. फडणवीस मात्र २ लाख कोटी थेट राज्याच्या तिजोरीत येणार असल्याचं भासवत आहेत,’ असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्राच्या वार्षिक उत्पन्नाच्या ५ टक्के रक्कम रिझर्व्ह बँक उपलब्ध करून देणार असून ही रक्कम १ लाख ६० हजार कोटी आहे, असं फडणवीसांचं म्हणणं आहे. हे साफ खोटं आहे. जीएसडीपीच्या ३ टक्के रक्कम आरबीआयकडून घेण्याची परवानगी राज्यांना आधीपासूनच होती. ती आता २ टक्क्यांनी वाढवली असली तरी त्यातील फक्त अर्धा टक्के म्हणजेच १५ ते १६ हजार कोटी तातडीनं मिळू शकतात. उर्वरीत दीड टक्के (सुमारे ४५ हजार कोटी) रकमेसाठी अनेक अटी घालण्यात आल्या आहेत,’ असंही चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिलं आहे.

‘केंद्र सरकारचं बहुतांश पॅकेज कर्जरूपातील आहे. पण याचा लाभ अटीशर्तींचं पालन करणाऱ्या व कर्जाची परतफेड करण्याची क्षमता असलेल्यांनाच मिळणार आहे. खरंतर अनेक किरकोळ विक्रेते, सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योजक कर्ज घेऊ शकतील का, हा प्रश्न आहे. त्यामुळं पात्र नसणाऱ्या व उचल न घेतलेल्या कर्जाची रक्कम महाराष्ट्राला मदत म्हणून दाखवणं ही हातचलाखी आहे. फडणवीसांनी जनतेची अशी दिशाभूल करू नये,’ असं चव्हाण यांनी सुनावलं आहे.