‘या’ कारणामुळे झाला औरंगाबादचा लॉकडाऊन रद्द
झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!
31 March :- सामान्य नागरिकांमधून व्यक्त हाेणारा तीव्र राेष, आमदार-खासदार, व्यापाऱ्यांसह विविध संघटनांकडून हाेणाऱ्या विराेधापुढे झुकत अखेर जिल्हा प्रशासनाने बुधवारपासून (३१ मार्च) आैरंगाबादेत लागू हाेणारा कडक लाॅकडाऊनचा निर्णय मागे घेतला. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय जाहीर केला. खासदार इम्तियाज जलील यांनी प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले असून बुधवारी काढण्यात येणारा माेर्चाही रद्द करण्यात आल्याची घाेषणा पत्रकारांशी बाेलताना केली.
आैरंगाबाद जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संसर्गाची ही साखळी ताेडण्यासाठी ११ मार्चपासून अंशत: लाॅकडाऊन लावण्यात आला हाेता. त्यानुसार दरराेज रात्री आठनंतर संचारबंदी व शनिवार-रविवार पूर्ण बाजारपेठ बंदचे आदेश हाेते. मात्र त्यानंतरही रुग्णसंख्येचा वाढता आलेख कमी हाेत नव्हता. त्यामुळे ३० मार्चपासून कडक लाॅकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र नंतर त्यात थाेडासा बदल करून ३१ मार्चपासून हे आदेश लागू करणार असल्याचे सांगण्यात आले.
मंगळवारी दुपारी सर्वपक्षीय लाेकप्रतिनिधींची बैठक घेऊन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लाॅकडाऊन लावणे कसे गरजेचे आहे ते सांगितले. मात्र या बैठकीतही लाेकप्रतिनिधींनी लाॅकडाऊनला तीव्र विराेधच दर्शवला. तत्पूर्वी छाेटे- माेठे व्यापारी, उद्याेजक व विविध संघटनांनीही विराेधात भूमिका घेतली हाेती. सामान्यांमधूनही प्रशासनाविराेधात प्रचंड राेष वाढत हाेता. खासदार इम्तियाज जलील यांनी तर ३१ मार्च राेजी लाॅकडाऊनविराेधात माेर्चा काढण्याचा इशाराही दिला हाेता.
छाेट्या-माेठ्या व्यापाऱ्यांसह २५ हून अधिक संघटनांनी या माेर्चाला पाठिंबा जाहीर करून रस्त्यावर उतरण्याची तयारी दर्शवली हाेती. या जनक्षाेभापुढे झुकत प्रशासनाने अखेर लाॅकडाऊनचा निर्णयच रद्द केला. ‘खासदार व व संघटनांच्या दबावापोटी हा निर्णय घेतला का?’ या प्रश्नावर जिल्हाधिकारी म्हणाले, ‘लोकशाहीत सगळ्यांना विचार मांडण्याचा अधिकार आहे. ज्याप्रमाणे त्यांनी लॉकडाऊनला विरोध केला त्याचप्रमाणे त्यांनी आता जनजागृती, लसीकरणासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.