शरद पवारांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी विविध स्तरांतून प्रार्थना
अनेक नेत्यांसह दिग्गजांनी प्रकृती स्वास्थ्यासाठी व्यक्त केल्या सदिच्छा
30 March :- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना पोटात दुखत असल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. येत्या बुधवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असून आजपासूनचे त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत असंही त्यांनी सांगितलं आहे.
झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!
दरम्यान, ब्रीच कँडीमध्ये शरद पवारांची तपासणी झाल्यानंतर त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. दोन दिवस औषधे बंद करण्यात आली आहेत. शिवाय 31 मार्चला अँडोस्कोपी झाल्यानंतर शस्त्रक्रिया केली जाईल. त्यामुळे शरद पवारांचे आजपासूनचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले. शरद पवारांच्या प्रकृतीबाबत माहिती कळताच विविध स्तरांतून त्यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मनसे प्रमुख राज ठाकरे, भारतरत्न लता मंगेशकर, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांच्यासह अनेक नेत्यांनी आणि दिग्गजांनी त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, श्री शरद पवारजी यांच्या प्रकृती अस्वास्थाबद्दल कळले. त्यांना लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो.