महाराष्ट्र

कोरोनाचे थैमान! वाढत्या मृत्यूमुळे स्मशानभूमीत अंत्यसंस्कारसाठी प्रतीक्षा

तासंतास नातेवाईकांना पाहावी लागतेय वाट

28 March :- कोरोनाचा वाढता उद्रेक इतका भयंकर होऊ लागला आहे की आता स्मशानभूमीमध्येही अंत्यसंस्कारासाठी जागा मेलने कठीण होऊ लागले आहे. वाढत्या मृत्यूमुळे चक्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कारसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे इतकी वाईट वेळ या कोरोनाने आणली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुन्हा कोरोना विषाणूने जळगावात थैमान घालण्‍यास सुरूवात केली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येसोबत मृत्यूचा आकडाही वाढत आहे. गेल्या 24 तासात 20 रुग्णांचे मृतदेह हे स्मशानभूमीत आले असून या मृतांमध्‍ये सर्वाधिक कोरोना बाधितांचा समावेश असल्याची नोंद स्मशानभूमीत घेण्‍यात आली आहे. त्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तासंतास नातेवाईकांना वाट पाहावी लागत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा

जळगाव जिल्ह्यात कोरोनाने विळखा घातला असून कोरोनामुळे दररोज बळी पडणाऱ्यांची संख्‍या आता पुन्हा वाढत चालली आहे. या बाधित मृतांवर शहरातील नेरीनाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. त्यासाठी स्वतंत्र व्यवस्थाही त्याठिकाणी करण्‍यात आली आहे. दररोज कोरोना आणि अन्य आजारामुळे मृत्यू पावलेल्या 20 पेक्षा अधिक व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले जातात. मागील वर्षी कोरोनाने अक्षरश: थैमान घातल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. आता पुन्हा कोरोनाने पाय पसरवले आहे.

एकीकडे कोरोना बाधित आढळून येणाऱ्यांची संख्‍या दीड हजारापर्यंत पोहचली असताना, दुसरीकडे बाजार पेठांमधील गर्दी अजूनही कायम आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात 12 ते 15 व्यक्तींचे दररोज मृत्यू होत आहेत. गेल्या 24 तासात 20 मृतदेह स्मशान भूमीत आले असून प्रतीक्षा यादीनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करत असल्याची माहिती स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

रोज होणाऱ्या मृतांमध्‍ये सर्वाधिक कोरोना बाधितांचा समावेश आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यातील कोरोना बाधितांवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. कोरोना बाधित रुग्णांसाठी मनपातर्फे नेरी नाका परिसरातील स्मशानभूमी राखीव ठेवण्यात आली आहे. तसेच लवकरच गॅसदाहिनी देखील कार्यान्वित करण्यात येणार असून 45 मिनिटांत अंत्यसंस्कार होणार अशी माहिती मनपा आयुक्तांनी दिली आहे.