चप्पलचा हार घालून अधिकाऱ्याला टाकले बांधून खुर्चीला
वीज पुरवठा खंडित केल्यामुळे घडला हा प्रकार
27 March :- महावितरणाने महाराष्ट्रात वीज कनेक्शन तोडण्याचा धडाका लावला आहे. शहरी भागात वीज बील न भरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. त्याचा फटका संपुर्ण सोसायटीला होताना दिसत आहे. तर आता ग्रामीण भागात देखील महावितरणाने शेतकऱ्यांच्या शेतातील वीज तोडणी सुरू केली आहे. यावरूनच जळगावातील भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी थेट महावितरण अधिकाऱ्यांचे कार्यालय गाठत आधिकाऱ्यालाच चप्पलची हार घालून खुर्चीला बांधले.
जळगावातील चाळिसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी काही शेतकऱ्यांसोबत एमआयडीसीच्या मुख्य कार्यालयात धडक मारली. शेतकऱ्यांच्या शेतातील वीज तोडल्यामुळे पिकांचे नुकसान होत असल्याचं सांगितलं.तर आमदारांनी आक्रमक भुमिका घेत आधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी वरिष्ठांच्या आदेशानुसार आपण काम करत असल्याचे अधिक्षक अभियंत्याने उत्तर दिले. त्यांच्या या उत्तराने शेतकरी अधिकच संतप्त झाले.
समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने आमदारांनी आणि शेतकऱ्यांनी थेट अधिक्षक अभियंता अधिकाऱ्यालाच खुर्चीला दोरीच्या सहाय्याने बांधले. चप्पलचा हार या अभियंता अधिक्षकाला घालण्यात आला. त्यांना थेट त्याच बांधलेल्या अवस्थेत कॅबिन मधून मुख्य आवारात उचलून आणले. यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन आधिकाऱ्याची सुटका केली.
दरम्यान, पोलिसांनी मंगेश चव्हाण यांना आणि आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना अटक केली आहे. तर मी ही शेतकऱ्याचा मुलगा आहे. आमदार मिरवण्यासाठी झालो नाही. शेतकरी वीज बिल भरायला गेले, तेव्हा त्यांना 10 वर्षाची थकबाकी शिल्लक आहे असं सांगण्यात आलं. लवकरच शेतकऱ्यांची वीज जोडणी करावी अन्यथा मोठं आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही आमदार चव्हाण यावेळी दिला आहे.