स्वाराती रुग्णालयातील ५० डॉक्टरांना मुंबईला हलविण्याचा घाट….
स्वाराती रुग्णालयातील ५० डॉक्टरांना मुंबईला हलविण्याचा घाट..
▪कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना डॉक्टरांची कमतरता भासणार
अंबाजोगाई : (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यात मागील आठवड्यापासून कोरोनाग्रास्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नेमके अशावेळी राज्य शासन अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयातील ५० डॉक्टरांना मुंबईतील कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी हलविण्याच्या विचारात आहे. हा निर्णय झाला तर त्याचा जबर फटका चार जिल्ह्यातील रुग्णांना बसणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दिवसेंदिवस बीड जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर होत आहे. सध्या जिल्ह्यात एकूण ४१ कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरु आहेत. हे सर्व रुग्ण केवळ एका आठवड्यात सापडलेले आहेत. कोरोनाग्रस्तांची झपाट्याने वाढणारी संख्या लक्षात घेता जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा तुटपुंजी पडणार असून अधिक डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासणार आहे. मात्र, राज्य शासन नेमके याच्या उलट निर्णय घेण्याच्या तयारीत असून अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील ५० डॉक्टरांना मुंबई येथे प्रतिनियुक्तीवर पाठविण्यासाठी वेगाने हालचाली सुरु आहेत. त्यासाठी आरोग्य संचालकांनी या डॉक्टरांबद्दल माहिती मागविल्याचे खात्रीशीर सूत्रांनी सांगितले. आधीच स्वाराती रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता आहे. बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी या चार जिल्ह्यातील रुग्ण स्वस्त आणि खात्रीशीर उपचारांसाठी स्वाराती रुग्णालयावर अवलंबून आहेत. या निर्णयामुळे भविष्यकाळात स्वाराती रुग्णालयात डॉक्टरांचा तुटवडा भासला तर ते गोगरीब रुग्णांना परवडणारे नाही. कोरोनाचा कहर वाढत असताना डॉक्टर हलविणे म्हणजे या रुग्णांना मृत्युच्या दाढेत ढकलल्यासारखे होईल. त्यामुळे राज्य शासनाच्या विचाराधीन असलेल्या निर्णयाविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. कुठल्याही परिस्थितीत येथील डॉक्टरांना मुंबईला हलवू देणार नाहीत अशी भूमिका अंबाजोगाईकरांनी घेतली आहे. ▪ रुग्णसेवेवर विपरीत परिणाम होईल : आ. नमिता मुंदडा
बीड जिल्हा ऊसतोड कामगारांचा, शेतमजुरांचा जिल्हा आहे. हे लोक उपचारासाठी स्वराती रुग्णालयावर अवलंबून आहेत. तसेच, आजूबाजूच्या जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णही बहुसंख्येने स्वाराती रुग्णालयात येत असतात. त्यामुळे डॉक्टरांची संख्या कमी झाल्यास रुग्णसेवेवर विपरीत परिणाम होईल. कोरोनाचे रुग्ण वाढत असताना असा कोणताही निर्णय शासनाने घेऊ नये. अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आ. नमिता मुंदडा यांनी दिला आहे.