महाराष्ट्र

पुढील 5 दिवस राज्यात जोरदार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

मराठवाड्यातही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

19 March :- गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानाचा पारा चढला असून शरीराची लाहीलाही व्हायला सुरुवात झाली आहे. असं असताना पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी खुप महत्त्वाचे आहेत. कारण मुंबई हवामान खात्याने पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यातही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्याचबरोबर राज्यातील एक-दोन ठिकाणी गारपीटही होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

‘दै.झुंजारनेता वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँप लाईव्ह अपडेटस

आज 19 मार्च रोजी जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यातील विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांत साधारणतः 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारा वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा हातातोंडाला आलेला घास जमीनीदोस्त होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात गहू पीक काढणीला आला आहे. त्यामुळे लवकरात लवकर गहू काढण्याची गरज आहे.

जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यात 20 आणि 21 मार्च रोजी या जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.याठिकाणी वादळी वाऱ्यासोबत मेघगर्जना आणि पाऊस अशा प्रकारच वातावरण मध्य महाराष्ट्रासहीत मराठवाडा आणि विदर्भात राहणार आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस राज्यातील वातावरणात मोठे बदल होणार आहेत. यामुळे राज्यातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात धांदल उडू शकते. हा त्रास वाचवण्यासाठी नागरिकांनी लांबचा प्रवास टाळावा.