महाराष्ट्र

चौकाचौकात उभारून गीत गात मागतायेत थकीत वीज बिल

महावितरण विभागाची ग्राहकांना आगळी -वेगळी विनवणी

14 :- अवाजवी वीज बिल, त्यावरून अधिवेशनात गोंधळ, वीज तोडणीला स्थगिती अन अधिवेशन संपताच पुन्हा वीज तोडणीला सुरुवात. एकीकडे हे सगळं सुरू असताना पिंपरी चिंचवडमध्ये महावितरण विभागाकडून मात्र ग्राहकांना एक आगळ्या-वेगळ्या पद्धतीने विनवणी केली जातीये. चौकाचौकात उभं राहून कर्मचारी संगीत गातायेत आणि मग थकीत वीज बिल भरा अशी विनवणी ते या माध्यमातून करतायेत.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

ही मोहीम नागरिकांचं लक्ष वेधून घेणारी ठरतेय. कोरोनाचा शिरकाव झाला आणि देश लॉकडाऊन झाला. कंपन्या बंद झाल्या, व्यवसाय ठप्प झाले. तरी ही अनेकांना डोळं चक्रावणारी वीज बिलं हातात पडली. आधीच लॉकडाऊनमुळं प्रत्येकाला आर्थिक चणचण जाणवत होती, त्यात महावितरण विभागाने अवाजवी बिलं दिल्याची धक्कादायक बाब समोर आली. यावरून ग्राहकांनी महावितरण विभागाच्या भोंगळ कारभारावर बोट ठेवलं.

विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलून धरला आणि महाविकासआघाडी सरकारला धारेवर धरलं. एकाही ग्राहकाने बिल भरू नये असं आवाहन विरोधकांनी केलं. परिणामी वीज बिलं थकीत राहिली. म्हणूनच आजच्या तारखेला एकट्या पिंपरी चिंचवड शहरातील 45 हजार ग्राहकांकडे तब्बल 64 कोटींची थकबाकी आहे. राज्याची ही आकडेवारी हजारो कोटीत जाऊन पोहचली आहे. त्यामुळे राज्य सरकारने थकीत धारकांची वीज तोडणी करण्याचे आदेश दिले.